राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडवे जिल्हा परिषद गटाची आबलोली येथे बैठक

गुहागर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक आबलोली येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा, पक्ष संघटन बळकट करणे आणि आगामी निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, तालुका सचिव संतोष जोशी, पडवे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष तुषार सुर्वे, पडवे पंचायत समिती गण अध्यक्ष आशिर्वाद बारसकर, पाचेरी सडा गण अध्यक्ष शशिकांत पवार, तसेच श्रीधर बागकर, दीपक शिरधनकर, प्रकाश पवार, स्मिता वेल्हाळ, सानवी सुर्वे, प्रकाश कारेकर, ओंकार रहाटे, संजय सुर्वे, रोहित मिरगळ आणि तवसाळ गाव अध्यक्ष विजय शिवलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवून लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

तुषार सुर्वे यांनी स्थानिक विकासकामांबाबत भूमिका मांडत प्रशासनाशी समन्वय साधून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे वाढवणे, तरुणांना संधी देणे आणि पक्ष संघटना मजबूत करणे या मुद्द्यांवर सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली.

बैठकीचा समारोप पक्षाच्या एकतेचा निर्धार करत आणि आगामी काळात अधिक सक्रियपणे काम करण्याच्या आवाहनाने करण्यात आला. आबलोलीतील ही बैठक पक्षासाठी नवे ऊर्जा बळ देणारी ठरली.

संबंधित लेख