खेंड बडदेवाडीत घराच्या छपरावर दरड कोसळली
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 191 views
चिपळूण | प्रतिनिधी : शहरातील खेंड बडदेवाडी परिसरात बुधवारी सकाळी प्रकाश डांगे यांच्या घराच्या छपरावर दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच संबंधित कुटुंबीयांनी माजी नगरसेवक आशिष खातू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने ही बाब नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच नगराध्यक्ष सकपाळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व कुटुंबीयांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी कुटुंबीयांनी सदर ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची तातडीची मागणी केली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या वरच्या बाजूला डोंगरातून चिपळूण नगर परिषदेची मोठी पाण्याची पाइपलाइन गेलेली असून, या लाईनमधून वारंवार लिकेज होत आहे. त्यामुळे माती सैल होऊन दगड कोसळण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली.
या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करत योग्य ती कार्यवाही करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही कुटुंबीयांना दिली.
या वेळी माजी नगरसेवक आशिष खातू, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
