रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची प्रेरणादायी कहाणी

डिप्रेशनमुळे एनडीए सोडावे लागले, पण हार न मानता बनले आयएएस अधिकारी 

योगेश बांडागळे 
चिपळूण  : “कधीही अंधारातून घाबरू नका, तिथूनच प्रकाशाचा मार्ग निघतो” – हाच संदेश देणारी आहे IAS मनुज जिंदल यांची कहाणी. डिप्रेशनच्या अंधारातून बाहेर येत त्यांनी आयुष्यात नवा प्रकाश शोधला आणि भारताच्या सर्वोच्च नागरी सेवेत प्रवेश मिळवला.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेले मनुज जिंदल यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर देहरादूनमधील नामांकित शाळेत प्रवेश घेतला. शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) परीक्षेत घवघवीत यश मिळवत थेट निवड मिळवली.

डिप्रेशनचा अंधार आणि आत्मशोधाची सुरुवात

एनडीए प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात ते टॉपर ठरले, मात्र दुसऱ्या सत्रात डिप्रेशन आणि मानसिक अस्वस्थतेने त्यांना गाठले. आत्मविश्वास डळमळला, शारीरिक जखमा झाल्या, आणि शेवटी अकॅडमीकडून निष्कासन करण्यात आले. जवळपास तीन-चार महिने त्यांना मानसिक उपचार घ्यावे लागले.

या कठीण काळात त्यांच्या वडिलांनी खंबीर साथ दिली. "आई-वडील आणि भावाने मला आधार दिला. काहींनी टोमणे मारले, पण मी लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले," असे मनुज जिंदल यांनी सांगितले.

परदेशात शिक्षण, पुन्हा भारतात परत

एनडीएनंतर त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. वर्जिनिया विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण करून, बार्कलेज बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरीत काम केले. परंतु भारतात काहीतरी सकारात्मक काम करण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

भाऊ यूपीएससीची तयारी करत असल्यामुळे प्रेरणा मिळाली. त्यांनी २०१४ साली पहिला प्रयत्न केला, प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली, पण अंतिम निवड झाली नाही. दुसऱ्या प्रयत्नातही रिझर्व्ह लिस्टमध्ये नाव आलं. अखेर, २०१७ साली तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी संपूर्ण देशात ५२ वा क्रमांक मिळवत IAS अधिकारी म्हणून यशस्वी झेप घेतली.

सध्या जिल्हाधिकारी, समाजसेवेची ओढ कायम

मनुज जिंदल यांनी बुलढाणा जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि सध्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते सोशल मीडियावरही सक्रीय असून, तरुणांना यूपीएससीची आणि जीवनातील संघर्षांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करतात.

आयएएसमनुज जिंदल यांची ही जीवनकथा सर्वसामान्य तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरते आहे. संकटं कितीही मोठी असली, तरी प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश नक्की गाठता येते, हे त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले आहे.
 

संबंधित लेख