रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजाचा मेळावा १८ जानेवारीला चिपळूणमध्ये
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 102 views
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजाचा भव्य मेळावा रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी कै. राधाताई लाड सभागृह, वैश्य भवन, चिपळूण येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या मेळाव्याचे अध्यक्षपद वैश्य वाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास शेट्ये भूषवणार आहेत.
या कार्यक्रमाला अहिल्या ज्ञान प्रसारक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आदित्य चिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, मुंबई वेळेळी तंबाखू व्यापारी पतसंस्थेच्या चेअरमन तसेच ‘वैश्य विजय’ मासिकाच्या संपादिका सौ. जागृती जयवंत गांगण या प्रमुख वक्त्या म्हणून समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील वैश्य वाणी समाजाचे निवडून आलेले व स्वीकृत नगरसेवक तसेच नगराध्यक्षांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचवेळी संस्थेमार्फत दिले जाणारे ‘वैश्यरत्न पुरस्कार’ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी रत्नागिरीतून अॅड. विलास पाटणे, तर मुंबईहून नितीन कोलगे, विकास संसारे, मकरंद केसरकर, श्री जयवंत गांगण यांच्यासह अनेक मान्यवर समाजबांधव उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यामध्ये समाजाच्या विविध समस्या, शंका, शासकीय योजना तसेच ओबीसी दाखला मिळविताना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करून योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या महत्वपूर्ण मेळाव्यास बहुसंख्य समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष व वैश्य पतसंस्थेचे चेअरमन हेमंतशेठ शिरगावकर यांनी केले आहे.
