चिपळूणमध्ये कात उद्योगावर जीएसटीचा छापा

चिपळूण : तालुक्यातील दहीवली खुर्द येथील एका कात उद्योगावर गुरुवारी पहाटे जीएसटी विभागाने छापा टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सावर्डे परिसरात गेल्या महिनाभरात ही सलग दुसरी मोठी कारवाई असून, तरीही दोन्ही कारवायांबाबत प्रशासनाकडून मौन बाळगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच सावर्डे येथील एका कात उद्योजकावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला होता. सलग दोन दिवस ईडीचे पथक तेथे ठाण मांडून होते. या कारवाईदरम्यान काही प्रमाणात बेकायदेशीर लाकूडसाठा आढळल्याची चर्चा होती. मात्र, त्या कारवाईनंतर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत आजतागायत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे या कारवाईनंतरही सावर्डे परिसरातील कात कारखाने पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र आहे.

दहीवली खुर्द (ता. चिपळूण) येथे गेल्या अनेक वर्षांपासून कात उद्योग सुरू आहे. गुरुवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा दहीवली गावात दाखल झाला. पहाटेच आलेल्या पथकाने कारखान्याचा संपूर्ण परिसर ताब्यात घेत मुख्य प्रवेशद्वारावर सीआयएसएफचे जवान तैनात केले. कारखान्याच्या आत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही, तसेच बाहेरूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत जीएसटीचे अधिकारी कारखान्यात तळ ठोकून होते. मात्र, या कारवाईत नेमके काय निष्पन्न झाले, पथकाच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले का, तसेच छापा नेमका कोणत्या कारणासाठी टाकण्यात आला, याबाबतची माहिती पूर्णपणे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या गुप्त कारवाईमुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून, अधिकृत खुलासा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख