नवनिर्मितीचे ऋषी परशुराम-धर्म, तत्त्वज्ञान आणि निसर्गसंवर्धनाचा प्रज्ञापुरुष
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 99 views
दैनिक सागरचे संपादक नाना जोशी यांच्यासोबत परशुराम मंदिरात अनेक वेळा जाण्याचा योग आला. मंदिराच्या परिसरात ते वावरताना केवळ एक भाविक म्हणून नव्हे, तर इतिहासाचा शोध घेणारा अभ्यासक म्हणून फिरायचे.
ते सांगायचे, “या मंदिराचा जीर्णोद्धार ब्रह्मेंद्र स्वामींनी केला. त्या काळात त्यांना अनेक अडथळे आले, पण विविध राजांनी त्यांना सहाय्य केले.”
त्यांच्या बोलण्यातून नेहमीच “भार्गवराम” हा शब्द बाहेर पडायचा.
हीच पार्श्वभूमी मनात घेऊन काही दिवसांपूर्वी मी आणि पत्रकार मित्र राजेंद्र शिंदे, अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला नुकतेच प्रकाशित झालेले आपले पुस्तक ‘नवनिर्मितीचे ऋषी परशुराम’ दिले.
दिवाळीच्या गडबडीतही पहिल्याच दिवशी सायंकाळी हे पुस्तक हातात घेतले आणि एका बैठकीत पूर्ण वाचून काढले. हे केवळ वाचन नव्हते, तर विचारप्रवर्तनाचा एक अनुभव होता.
मुखपृष्ठाचा गूढ संदेश
भगवान परशुराम म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर नेहमीच येते धनुष्यबाण घेतलेले, रणांगणात सज्ज असलेले रूप, पण या पुस्तकाचे मुखपृष्ठ पूर्णतः वेगळे आहे.
आर्या भालचंद्र पटवर्धन यांनी रेखाटलेल्या चित्रात भगवान परशुराम ध्यानस्थ आहेत. डोळे बंद नाहीत, तर उघडे आहेत. परशु त्यांच्या बाजूला ठेवलेला आहे. ते निर्माण केलेल्या भूमीकडे, अपरांतकडे त्यांचे लक्ष केंद्रित आहे.
डॉ. पटवर्धन सांगतात,
“भगवान परशुराम सतत युद्धात नव्हते. त्यांच्या जीवनातील युद्ध हा केवळ एक अंश आहे. बाकीचे जीवन त्यांनी धर्मसंस्थापना, समाजघडणी आणि तपश्चर्येसाठी वाहिले. म्हणूनच मुखपृष्ठावर त्यांचे ‘ध्यानस्थ पण सजग’ रूप दाखवले आहे.”
हे मुखपृष्ठ पुस्तकाच्या आशयाचे प्रतीक ठरते. लढाईच्या पलीकडे जाणारा, मानवतेचा संदेश देणारा परशुराम.
कथाकथनातून विचारांचे सादरीकरण
डॉ. प्रशांत पटवर्धन हे व्यावसायिक असूनही अत्यंत संवेदनशील कथाकथनकार आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कथाकथन या विषयात सुवर्णपदक मिळवले आहे.
त्यांच्या लेखनशैलीत संशोधन, तत्त्वज्ञान आणि साहित्यिकतेचा सुंदर संगम दिसतो.
परशुरामांचा विशाल आणि गुंतागुंतीचा विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी “कथारूप” निवडले. कारण कथा ही मानवी संवादाची सर्वात जुनी आणि प्रभावी पद्धत आहे. बालपणापासून आपण गोष्टी ऐकतो, शिकतो, म्हणूनच त्यांनी ग्रंथात्मक न ठेवता कथात्मक शैली स्वीकारली.
प्रत्येक कथा वाचताना असं वाटतं की, आपण आजीच्या घरात बसलो आहोत आणि ती आपल्याला परशुरामांच्या अद्भुत प्रवासाच्या गोष्टी सांगते आहे, पण त्या गोष्टी संशोधनाच्या प्रकाशात उजळलेल्या आहेत.
भार्गवराम ते परशुराम- नावामागील अर्थ
लेखकाने "भृगु कुळातील राम" म्हणून भार्गवराम आणि "परशुधारी" म्हणून परशुराम या नावांची उत्पत्ती सहज व स्पष्ट केली आहे.
त्यांनी प्राचीन ग्रंथांचा संदर्भ देत सांगितले की, परशुराम हे केवळ एक योद्धा नव्हते, तर धर्मसंरक्षक होते. त्यांच्या कृतींमागे वैचारिक अधिष्ठान होते.
मातृहत्येचा गैरसमज आणि तत्त्वज्ञानाची मांडणी
भगवान परशुरामांना मातृहत्यारा म्हणून ओळखले जाते. पित्याच्या आज्ञेवरून मातेचे शिर कापले, आणि नंतर वर मागून पुन्हा तिला जिवंत केले, ही कथा सर्वश्रुत आहे, पण डॉ. पटवर्धन यांनी या आख्यायिकेचा अर्थ वेगळ्या प्रकाशात स्पष्ट केला आहे.
त्यांनी सांगितले की परशुरामांनी लोहीत पर्वत फोडला आणि मृत झालेल्या भूमीला पुन्हा जिवंत केले. त्यांनी पर्वताचे मस्तक फोडून जलप्रवाह दक्षिणेकडे वळविला. या पाण्याने मृतप्राय भूमीला पुनर्जन्म दिला.
म्हणजेच त्यांनी “भूमातेचे शीर कापले” हे केवळ प्रतीकात्मक होते, ते निसर्गशास्त्रीय दृष्टिकोनातून “जलसंवर्धन” होते.
अशा प्रकारे परशुरामांनी त्या काळातच नदीजोड प्रकल्पाचे तत्त्व सांगितले होते. ही कथा धार्मिक आख्यायिकेच्या रूपात सांगितली गेली आणि काळाच्या ओघात तिचा अर्थ हरवला.
डॉ. पटवर्धन यांच्या लेखनाने त्या तत्त्वज्ञानाला नवा अर्थ आणि वैज्ञानिक पाया दिला आहे.
धर्मसंस्थापनेचा योद्धा
“राजधर्माची पुनःस्थापना” या कथेतून परशुरामांचा धर्मरक्षक दृष्टिकोन अत्यंत प्रभावीपणे समोर येतो.
सहस्रार्जुनाच्या पुत्रांनी जमदग्नींची हत्या केली. रेणुका मातेनं परशुरामांची प्रार्थना केली. परशुरामांनी अधर्माने वागणाऱ्या राजांचा नाश केला. पण त्यांनी सर्व क्षत्रियांना नाही, तर निधर्मी राजांनाच शिक्षा केली.
त्यांनी जिंकलेली भूमी स्वतःसाठी ठेवली नाही, तर धर्मपालन करणाऱ्यांना राज्य दिले. म्हणजेच त्यांचा संघर्ष सत्तेसाठी नव्हता, तर धर्मसंस्थापनेसाठी होता.
त्यांची लढाई अन्यायी राजवटीविरुद्ध होती — आणि हेच त्यांना “नवनिर्मितीचा ऋषी” बनवते.
कोकणभूमीची निर्मिती-अपरांताचा सर्जनशील पुरूष
भगवान परशुरामांनी पृथ्वी आचार्य कश्यपांना दान केल्यानंतर स्वतः समुद्र मागे हटवून अपरांत भूमी — म्हणजेच आजची कोकणभूमी निर्माण केली.
समुद्राचे गर्वहरण करून त्यांनी सह्यपर्वतावरून धनुष्यबाण सोडला, आणि समुद्र मागे हटला. त्या भूमीवर त्यांनी समाज उभा केला, ग्रामव्यवस्था निर्माण केली, बारा बलुतेदार आणले, पिके घेतली, मंदिरं उभारली, जलस्त्रोत निर्माण केले.
ही केवळ भूमीची निर्मिती नव्हती, ही होती नवी संस्कृती निर्माण करण्याची प्रक्रिया.
आज ज्या कोकण भूमीला आपण “तपोभूमी” म्हणतो, तिचा पाया परशुरामांनीच रचला.
त्यांनी केवळ भूमी वसवली नाही, तर तिचे पुनर्वसन आणि व्यवस्थापन केले. याचाच अर्थ ते त्या काळातील सर्वात पहिले ग्रामविकास तज्ज्ञ होते.
कलरीपायट्टू ते कुंग फू-भारतीय ज्ञानाची परंपरा
डॉ. पटवर्धन यांनी कथांमधून दाखवले आहे की, परशुरामांनी केवळ धर्मसंस्था नाही, तर संरक्षणकला विकसित केली.
त्यांनी कलरीपायट्टू ही युद्धकला निर्माण केली. हीच कला पुढे दक्षिण भारतातील भिक्षु बोधिधर्म यांनी चीनमध्ये नेली, आणि तेथे ती कुंग फू म्हणून विकसित झाली. नंतर ती जपानमध्ये पसरली आणि त्यातून ज्यूडो, कराटे, आयकिडो अशा आत्मसंरक्षण कलांचा जन्म झाला.
केरळमधील लोककथांनुसार, परशुरामांनी पहिल्या १०८ कलरींची (प्रशिक्षण केंद्रांची) स्थापना केली आणि पहिल्या २१ गुरूंना शत्रूनाशासाठी मार्गदर्शन केले.
ही संकल्पना भारतीय तत्त्वज्ञान आणि शरीरशास्त्राच्या समन्वयाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
धर्म, समाज आणि विज्ञान यांचा संगम
डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी परशुरामांच्या जीवनकथेतील धार्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक घटक एकत्र गुंफले आहेत.
त्यांच्या लेखनातून दिसते की, परशुरामांनी निसर्ग, धर्म आणि मानवता या तिघांचा सुंदर समतोल राखला.
त्यांनी जलसंवर्धन केले, भूमी वसवली, समाजरचना केली, धर्मसंस्थापना केली आणि शिक्षणपद्धती विकसित केली.
म्हणजेच ते खऱ्या अर्थाने नवनिर्मितीचे ऋषी होते.
परशुरामांचे खरे दर्शन
या कथांमधून भगवान परशुरामांचे खरे स्वरूप उलगडते
ते केवळ युद्धवीर नव्हते, तर तपस्वी तत्त्वज्ञ होते.
त्यांनी अधर्माविरुद्ध शस्त्र उचलले, पण धर्मासाठी मस्तक झुकवले.
त्यांनी राज्य जिंकले, पण सत्तेपासून अलिप्त राहिले.
ते कर्मयोगी, समाजनायक आणि निसर्गसंरक्षक होते.
हेतू आणि अभ्यासाची जाण
डॉ. प्रशांत पटवर्धन हे वैचारिक लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात केवळ कथा नसतात, तर संशोधनात्मक निरीक्षणे असतात.
लघुकथांच्या माध्यमातून त्यांनी धर्मग्रंथांचा पुनर्विचार केला आणि लोकमानसातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भार्गवरामांचे मानवी, वैज्ञानिक आणि तात्त्विक पैलू वाचकांसमोर आणले आहेत.
नव्या पिढीसाठी परशुरामांचे पुनर्भान
नवनिर्मितीचे ऋषी परशुराम हे पुस्तक प्रत्येक अपरांतीयाने, विशेषतः नव्या पिढीने वाचले पाहिजे.
कारण या कथांमधून परशुरामांचा विचार “अविष्कार” म्हणून समोर येतो —
धर्माचे मूळ तत्त्व, निसर्गाशी संवाद, आणि समाजाच्या पुनर्निर्मितीचा संदेश.
काही किरकोळ शुद्धलेखनाच्या चुका पुढील आवृत्तीत दुरुस्त करता येतील, पण या पुस्तकाने भगवान परशुरामांना गैरसमजाच्या आवरणातून बाहेर काढून लोकमानसात नवी ओळख दिली आहे, यात शंका नाही. हे पुस्तक अमेझॉनसारख्या ऑनलाईन माध्यमांवर उपलब्ध व्हावे, इंग्रजीत अनुवादित व्हावे, जगभर परशुराम खऱ्या अर्थाने पोहोचण्यासाठी.
भगवान परशुराम हे केवळ पौराणिक पात्र नाहीत, तर त्यांनी दाखवलेला मार्ग धर्म, विज्ञान, निसर्ग आणि समाजघडणीचा संगम आजही तितकाच समकालीन आहे.
पुस्तक: नवनिर्मितीचे ऋषी परशुराम
लेखक: डॉ. प्रशांत पटवर्धन
मुखपृष्ठ रेखाटन: आर्या भालचंद्र पटवर्धन
लेख: योगेश रमेश बांडागळे, पत्रकार, चिपळूण
मो. ९९२३४२८८३८
