पाण्याच्या टाकी परिसरात अस्वच्छता; नगराध्यक्ष उमेश सकपाळ संतप्त
- by Yogesh Bandagale
- January 16, 2026
- 80 views
चिपळूण : चिपळूण नगर पालिकेच्या पाणी योजनेअंतर्गत गुहागर बायपास रोडवरील पाण्याच्या टाकी परिसरात दारूच्या बाटल्यांचा पडलेला कचरा आढळून आल्याने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाण्याची टाकी व तिच्या सभोवतालची जागा तात्काळ कंपाउंड करून सुरक्षित करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या.
नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी स्वच्छता, पाणी व आरोग्य या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, चिपळूण शहरवासीयांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नुकतीच त्यांनी ग्रॅव्हिटी पाणी योजनेची पाहणी केली असून, ही योजना मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यासोबतच शहरातील जुनी पाणी योजना सध्या कशा पद्धतीने सुरू आहे, याची पाहणी नगराध्यक्षांनी शुक्रवारी सायंकाळी केली. गोवळकोट येथील जॅकवेलला भेट देत त्यांनी तेथील संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. त्यानंतर गुहागर बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यात आली. ग्रॅव्हिटी पाणी योजना सुरू असताना एखादी अडचण उद्भवल्यास शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत सुरू राहील, तसेच जुनी योजना कशी मेंटेन केली जाईल, याबाबत त्यांनी माहिती घेत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
गांधारेश्वर येथे मंजूर असलेल्या जॅकवेलमधून पाणी कधीही कमी होत नसल्याने, येथून शहराला पाणीपुरवठा कशा पद्धतीने करता येईल, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गुहागर बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीभोवती कंपाउंड उभारण्याबरोबरच, भविष्यात नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही नगराध्यक्षांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, नगरसेवक उदय जुवळे आदी उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या या सक्रिय भूमिकेमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
