मांडकी–पालवण येथे राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाची वैचारिक पर्वणी

चिपळूण : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक आणि अनुभवाधारित दर्शन घडवणारे राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन मांडकी–पालवण येथे दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर हे भव्य संमेलन संपन्न होणार असून सर्व साहित्यप्रेमींनी तिन्ही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले आहे.

या संमेलनातील ग्रंथदिंडी हे प्रमुख आकर्षण ठरणार असून साहित्य व विचारांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार या विषयांवर आधारित साहित्याचा जागर या माध्यमातून केला जाणार आहे. समाजजीवनाशी निगडित प्रश्नांवर चर्चा होऊन उपस्थितांना नवे दृष्टिकोन व वैचारिक प्रेरणा मिळेल, असा विश्वास डॉ. भावे यांनी व्यक्त केला. संमेलनादरम्यान ग्रामीण साहित्य, कृषी सुधारणा, सहकार चळवळ आणि कोकणातील सांस्कृतिक वारसा या विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन, मुलाखती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ व सहकार क्षेत्रातील मान्यवर आपले विचार मांडणार असल्याने हे संमेलन सामाजिक व वैचारिक चळवळीचे केंद्र ठरणार आहे.

या राज्यस्तरीय संमेलनात अभिनेते संजय खापरे व ‘हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाच्या उत्साहात अधिक भर पडणार आहे. “साहित्यातील शब्दांचा उत्सव, शेतीचा संघर्ष आणि सहकारातून समृद्धी या विषयांवर नामवंत साहित्यिकांचे विचार ऐकण्याची ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्रातील सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन संजय खापरे यांनी केले आहे.

संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. संजय भावे, प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे, तर संयोजन समिती अध्यक्ष म्हणून प्रकाश देशपांडे काम पाहणार आहेत. राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ व सहकार क्षेत्रातील मान्यवर या संमेलनात सहभागी होणार आहेत.

संमेलनाच्या लोगोचे अनावरण कवी केशवसुत स्मारक येथे करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षा व रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते लोगोचे अनावरण झाले. ग्रामीण, कृषी व सहकार या त्रिसूत्रीवर आधारित साहित्य संमेलन महाराष्ट्रात प्रथमच आयोजित होत असल्याने हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्घाटक म्हणून खासदार शरदचंद्र पवार, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर समारोप अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची उपस्थिती लाभणार आहे. (मा. शरदचंद्र पवार व मा. नारायणराव राणे यांच्या प्रकृतीमुळे उपस्थितीबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात आली आहे.)

तीन दिवसांच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार १३ फेब्रुवारी रोजी ध्वजारोहण, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन उद्घाटन व स्थानिक कवींचे कवी संमेलन होईल. १४ फेब्रुवारी रोजी संमेलनाचे उद्घाटन, ग्रामीण साहित्यातील कोकण, ग्रामीण साहित्य काल-आज-उद्या, ग्रामीण कथाकथन, सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी तसेच ग्रामीण कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी कृषी साहित्य व शेती सुधारणा, सहकार विषयक मुलाखत, ‘आता आत्महत्या थांबवूया’ या विषयावरील परिसंवाद, मान्यवरांचा सत्कार, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि सायंकाळी समारोप समारंभ पार पडणार आहे.

ग्रामीण जीवन, शेती, सहकार आणि मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा जागर करणारे हे संमेलन कोकणातील साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी व रसिकांसाठी वैचारिक व सांस्कृतिक पर्वणी ठरणार असून ग्रामीण व कृषी साहित्याला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख