एसपीएम परशुराम शाळेच्या भूमी कदमची सुवर्णझेप
- by Yogesh Bandagale
- December 18, 2025
- 100 views
चिपळूण : एसपीएम परशुराम शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी भूमी सुरेंद्र कदम हिने ८ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट क्युरोगी आणि पूमसे तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत शाळेचा व रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
दि. २ ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो क्युरोगी व पुमसे अजिंक्यपद स्पर्धा २०२५ चे आयोजन स्वामी मंगल कार्यालय, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भूमी कदम हिने सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.
त्यानंतर दि. १३ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) व तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ८ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट क्युरोगी व पूमसे तायक्वांदो स्पर्धा साई सिल्व्हर ओक लॉन्स, शिर्डी (वॉटर पार्कजवळ), जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडली. या स्पर्धेत भूमी कदम हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. राष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा पंजाब येथे होणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शि.प्र. मंडळाच्या सर्व संस्था पदाधिकारी, शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र पटवर्धन सर, मुख्याध्यापिका सौ. आरती खाडिलकर मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भूमी कदम हिचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
