महायुती-महाविकास आघाडी की स्वबळावर? चिपळूण पालिका राजकारणात अद्यापही अनिश्चितता
- by Yogesh Bandagale
- November 07, 2025
- 293 views
चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळ्यांवरील राजकीय समीकरणे अद्यापही गुंतागुंतीची असून, स्थानिक राजकारणात संभ्रमाचे वातावरण प्रकर्षाने वाढले आहे. महायुतीनेच निवडणुका लढवू, असा संदेश देणारी वरिष्ठ नेतेमंडळी आणि नगराध्यक्षपद आपल्या पक्षाकडे यावे, या हेतूने स्वतंत्रपणे प्रचार सुरू करणारे स्थानिक इच्छुक, या दोन प्रवाहांमुळे कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. महायुतीचे ठरेना आणि महाविकास आघाडीचे काही समजेना, अशा वातावरणात सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार गोंधळलेले दिसत आहेत.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांनी हालचालींना गती दिली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनीही वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने स्थानिक स्तरावरील राजकीय समीकरणे सतत बदलत आहेत. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीचा निर्णय अंतिम होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य महाविकास आघाडीचे नवीन राजकीय अंकगणित जमते का, हेही महायुती शिबिरातून बारकाईने पाहिले जात आहे.
आघाड्यांतील सर्वच पक्षांना आपल्या उमेदवाराला नगराध्यक्षपद मिळावे, अशी स्पष्ट इच्छा असल्याने चर्चांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, दोन्ही आघाड्यांबाबत छातीठोक विधान करण्याचे धाडस कोणीही दाखवण्याच्या स्थितीत नाही.
मुंबईत होणारी महायुतीची आगामी बैठक निर्णायक ठरू शकते. या बैठकीत महायुती म्हणून संयुक्त लढाई करायची की, स्वबळावर निवडणूक लढविण्याचा मार्ग स्वीकारायचा, याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची चिन्हे आहेत. सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढण्यासाठी आतल्या गोटात तयारी पूर्ण केली असून, इच्छुकांकडून अर्ज मागवून संभाव्य उमेदवारांची यादीही तयार ठेवली आहे. स्वबळावरचा निर्णय झाल्यास ही यादी तत्काळ वापरली जाऊ शकते.
वेळेची टंचाई आणि निवडणूक अवधी कमी असल्यामुळे प्रचार, बूथ व्यवस्थापन आणि संघटनात्मक तयारीसाठी मर्यादित वेळ उपलब्ध आहे. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी स्वतंत्र निर्णय घेतले जातील, अशी शक्यता असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये तणाव वाढला आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीचा निर्णय वारंवार लांबणीवर जात असल्यामुळे काही इच्छुक स्पष्ट मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत असून, पक्षांतर्गत नाराजीचे सूरही उमटू लागले आहेत.
