भाजप नेते प्रशांत यादव यांचा वाढदिवस दणक्यात साजरा
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 117 views
चिपळूण : भाजप नेते तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचा वाढदिवस वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या भव्य नगरीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त यादव यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांची मोठी गर्दी उसळली होती. मिळालेल्या प्रेमळ शुभेच्छांमुळे प्रशांत यादव भावूक झाल्याचे चित्र दिसून आले.
चिपळूणमधील नामवंत उद्योजक असलेल्या प्रशांत यादव यांनी अल्पावधीतच सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्रात स्वतःची ठळक ओळख निर्माण केली आहे. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्यात कोकण आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, या उद्देशाने वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचे कार्य ते करत आहेत.
सोमवारी या कृषी महोत्सवाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. याच कृषी नगरीत प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन समितीतर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस यादव यांच्या सुविद्य पत्नी, चिपळूण नागरी सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी औक्षण केले. त्यानंतर केक कापताच उपस्थितांनी जल्लोष करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा सहाय्यक निबंधक डॉ. सोपान शिंदे, मुख्याधिकारी विशाल भोसले, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजेंद्र महाडिक, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप तालुकाध्यक्ष विनोद भुरण, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, एडवोकेट नयना पवार, सौ. आदिती गुढेकर, विनोद झगडे, राकेश शिंदे, सुप्रिया उतेकर, अन्वर जबले, गुलजार कुरवले, कु. स्वामीनी यादव, अमोल भोबस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे यांनी केले. त्यांनी प्रशांत यादव यांच्या राजकीय व उद्योजकीय वाटचालीचा आढावा घेत वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या उभारणीबाबत माहिती दिली.
वाढदिवसानिमित्त झालेली अभूतपूर्व गर्दी पाहून प्रशांत यादव यांनी समाधान व्यक्त केले. “मिळालेल्या शुभेच्छांमुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. जनसेवेचा वसा कधीही कमी होऊ देणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी चिपळूण नागरी वाशिष्ठी परिवार व यादव कुटुंबीयांनी उपस्थितांचे आभार मानले.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आपल्या मनोगतात, आपल्या विजयात प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे सांगत दोघांचे आभार मानले व चिपळूण शहराच्या विकासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची ग्वाही दिली.
