छोट्यांची जत्रा चिपळूणमध्ये प्रथमच; विद्याभारतीच्या ‘शिशुनगरी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : लहानग्यांसाठी आनंद, खेळ आणि अनुभवसंपन्न शिक्षणाचा अनोखा संगम साधणारी विद्याभारतीची ‘शिशुनगरी’ प्रथमच चिपळूणमध्ये उभारण्यात आली असून, तिला पालक व चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. स्वा. सावरकर मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शनिवार, दि. ३१ जानेवारी आणि रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी ही विशेष नगरी भरवण्यात आली आहे.

या शिशुनगरीत विज्ञानातील जादुई प्रयोग, चित्रांमधून गोष्टी सांगणे, गमतीशीर कोडी, गणितातील मजा अशा विविध आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. खेळातून शिकण्याचा आनंद मिळावा, मुलांची जिज्ञासा वाढावी आणि शिक्षण अधिक अनुभवात्मक व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

शिशुनगरीच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक उदय चितळे, विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) हेमंत भागवत, उपाध्यक्ष सुमेध करमरकर, कार्यवाह छायाताई मुसळे, सुरेशराव कशेळकर, जिल्हाध्यक्षा प्रा. सोनाली खर्चे तसेच जिल्हा उपाध्यक्ष दिपकशेठ वारे उपस्थित होते. यावेळी शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मान्यवरांनी शिशुनगरीच्या संकल्पनेचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या तसेच चिपळूणमधील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांसह शिशुनगरीला भेट द्यावी, असे आवाहन केले.

या शिशुनगरीत गणित व विज्ञान कार्यशाळा, कला विभाग, घर संकल्पना, चित्र पुस्तकालय, वस्तूसंग्रहालय, भाज्यांची विक्री, लहानग्यांसाठी विविध खेळ तसेच मल्लखांब यांसारखे उपक्रम पाहायला मिळत आहेत.
रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजता ‘जादूचे प्रयोग’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, तो मुलांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

चिपळूणमधील सर्व पालकांनी आपल्या लहानग्यांसह शिशुनगरीला भेट देऊन या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

संबंधित लेख