सह्याद्रीच्या साक्षीने श्री मार्लेश्वर–गिरिजादेवी विवाहसोहळा थाटात संपन्न
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 90 views
देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री. चि. देव मार्लेश्वर आणि साखरप्याची चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा पवित्र विवाहसोहळा (कल्याणविधी) आज बुधवारी दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विवाहसोहळा संपन्न होताच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये “हरहर महादेव… हरहर मार्लेश्वर… शिवहराचा जयघोष” दणाणून गेला.
संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कडे-कपारीत वसलेले स्वयंभू श्री मार्लेश्वर देवस्थान निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी ११ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होत असून मकरसंक्रांत दिनी मार्लेश्वर शिखरावर श्री मार्लेश्वर-गिरिजादेवी विवाहसोहळा हिंदू लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार आज बुधवारी दुपारी पार पडला. या सोहळ्याची जोरदार तयारी दोन दिवसांपासूनच मार्लेश्वर तीर्थक्षेत्री सुरू होती.
बुधवारी सकाळी मार्लेश्वराची पालखी, गिरिजादेवीची पालखी आणि यजमान व्याडेश्वराची पालखी या तिन्ही पालख्यांचे वऱ्हाडी मंडळींसह तीर्थक्षेत्री आगमन झाले. त्यानंतर परंपरेप्रमाणे मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान आदी विवाहपूर्व विधी विधीवत पार पडले. विवाहसोहळ्यापूर्वी तब्बल ३६० मानकरी यांना अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात आले होते.
विवाह विधीस सुरुवात होताच परंपरेनुसार आंगवलीचे अणेराव मार्लेश्वरचा टोप मांडीवर घेऊन तर लांजेकर स्वामी गिरिजादेवीचा टोप मांडीवर घेऊन बसले. लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली आणि मंगलाष्टकांच्या गजरात दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर रायपाटणकर स्वामी, म्हासोळकर स्वामी, धारेश्वर स्वामी आणि लांजेकर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न झाला.
या अभूतपूर्व विवाहसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमत होते आणि संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
या सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक सौ. नेहा माने, संतोष केदारी, प्रद्युम्न माने, शिवसेना शिंदे गटाचे सचिन मांगले, प्रसाद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान देवरूख आगाराच्या वतीने दिवसभर जादा बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच आरोग्य विभाग आणि महावितरण विभागाचे कर्मचारीही यात्रास्थळी तैनात होते. भक्ती, परंपरा आणि शिस्त यांचा संगम साधत यावर्षीचा मार्लेश्वर-गिरिजादेवी विवाहसोहळा अविस्मरणीय ठरला.
