हातखंबा कदमवाडीत दोन घरफोड्या; २ लाखांहून अधिक ऐवज लंपास
- by Yogesh Bandagale
- September 21, 2025
- 109 views
रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा कदमवाडी येथे दिवसा दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून, अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत घडली. फिर्यादी संजय शिवराम कदम (वय ४१, रा. हातखंबा, कदमवाडी) यांच्या घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील लॉकर फोडून त्यातून ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील जोड चेनसह, २५ हजारांची सोन्याची चेन, १५ हजारांची अंगठी आणि तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
दरम्यान, याच वेळेत हातखंबा तारवेवाडी येथील रमेश तारवे यांच्या घराचेही कुलूप तोडून कपाटातील रोकड चोरल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७७/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
