हातगाडी व्यावसायिकांचे रामतीर्थ तलावाशेजारील व्ह्यू गॅलरीत स्थलांतर

चिपळूण : चिपळूण शहरातील चौपाटी परिसरात असणारे स्टॉलधारक व हातगाडी व्यावसायिक यांना यापूर्वी महाराष्ट्र हायस्कूल परिसरात विस्थापित करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी वाढलेली अस्वच्छता, खवय्यांची मोठी गर्दी, तसेच रस्त्यावरच लागणाऱ्या वाहनांच्या रांगा यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर पालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुक्रवारी सकाळी रामतीर्थ तलावाशेजारी ७५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या व्ह्यू गॅलरीची पाहणी केली.

या वेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्ह्यू गॅलरी परिसर स्वच्छ ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेले गाळे भाडेतत्त्वावर देऊन इच्छुक व्यावसायिकांना फूड स्टॉल म्हणून उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश दिले. महाराष्ट्र हायस्कूल रोडवर सध्या असणारे भेळवाले, दाबेलीवाले, सँडविच, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेते आदी सर्व हातगाडी व्यावसायिकांना व्ह्यू गॅलरीमध्येच जागा देण्यात यावी, असेही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले.

या संदर्भात पुढील आठवड्यात मंगळवारी सकाळी दहा वाजता सर्व हातगाडी व्यावसायिकांची बैठक नगर पालिकेत आयोजित करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले आहेत. चौपाटी येथून हटवल्यानंतर महाराष्ट्र हायस्कूल परिसरात जाण्यास सुरुवातीला विरोध होत होता, मात्र सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खवय्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे व्ह्यू गॅलरीत नियोजनबद्ध पद्धतीने व्यवसाय सुरू झाल्यास नागरिक व खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला.

व्ह्यू गॅलरी परिसर अत्यंत आकर्षक असून समोर रामतीर्थ तलावाचे सुंदर दृश्य दिसते. लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा उपलब्ध असल्याने हा परिसर कुटुंबांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्ह्यू गॅलरीला खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर व नियोजनबद्ध पर्यटन व खाद्य केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिल्या.

या पाहणीवेळी शिवसेना विभाग प्रमुख फैसल मेमन, आरोग्य निरीक्षक वैभव निवाते, बांधकाम विभागाचे अभियंते महेश डफळ व दीपक निंबाळकर, बांधकाम मिस्त्री रवी सातपुते व प्रवीण जाधव, बांधकाम लिपिक रमेश कोरवी, रोहन सकपाळ, अभियंता विभागाचे साहिल कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख