पन्नाशी पार करूनही मैदानावर जिद्दीचा जल्लोष
- by Yogesh Bandagale
- April 22, 2026
- 103 views
गोट्या भोसले, निनाद कनगुटकर तसेच बाबल्या जाधव व इब्राहिम सरगुरोह यांचे समर्पण ठरले आकर्षण
योगेश बांडागळे
चिपळूण: चिपळूण तालुक्यात सध्या क्रिकेटचा हंगाम जोरात सुरू असून टेनिस क्रिकेटपासून ते सीजन बॉल क्रिकेटपर्यंत सर्वच स्तरांवर स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आठ दिवसांच्या राज्यस्तरीय आमदार शेखर निकम चषक स्पर्धेने क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र या स्पर्धेची खरी चर्चा रंगली ती मैदानावरील चार अनुभवी व्यक्तिमत्त्वांमुळे.
पंच गोट्या भोसले आणि निनाद कनगुटकर तसेच समालोचक बाबल्या जाधव आणि इब्राहिम सरगुरोह, या चौघांनीही वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही दाखवलेली ऊर्जा, जिद्द आणि क्रिकेटप्रेम हे या स्पर्धेचे खरे वैशिष्ट्य ठरले.
पवन तलावाच्या ऐतिहासिक मैदानावर जवळपास ४० अंश तापमानात सलग आठ दिवस दररोज दोन सामने अशा कठीण वेळापत्रकात पंच गोट्या भोसले आणि निनाद कनगुटकर न थकता उभे राहिले. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणताही पर्यायी पंच उपलब्ध नव्हता. तरीही त्यांनी अचूक आणि निष्पक्ष निर्णय देत सामने सुरळीत पार पाडले. जिल्ह्यासह राज्यभरात आपल्या निर्णय क्षमतेसाठी ओळख असलेल्या या दोन्ही पंचांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली.
दुसरीकडे, या स्पर्धेला खरी रंगत आणली ती समालोचकांच्या आवाजाने. बाबल्या जाधव यांचा उत्साही आणि प्रभावी समालोचनाचा अंदाज, तर इब्राहिम सरगुरोह यांचे हिंदीतून केलेले माहितीपूर्ण समालोचन यामुळे मैदानावरील प्रत्येक क्षण जिवंत झाला. सरगुरोह यांच्या सखोल क्रिकेट अभ्यासामुळे प्रेक्षकांना खेळाडू व सामन्यांबाबत उपयुक्त माहिती मिळाली, तर जाधव यांच्या खास शैलीने प्रेक्षकांमध्ये उत्साह कायम ठेवला.
चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये या चौघांची उपस्थिती नेहमीच महत्त्वाची मानली जाते. अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांनी क्रिकेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात या चारही जणांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. या वेळी आमदार शेखर निकम, क्रिकेटपटू राजेश पवार, अध्यक्ष दशरथ दाभोळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. क्रीडारसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या अनुभवी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला.
वय ही केवळ संख्या असते, याचा प्रत्यय देत पंच आणि समालोचकांनी दाखवलेले समर्पण हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून चिपळूणच्या क्रिकेट संस्कृतीला नवी ऊर्जा देणारे ठरले आहे.
