घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये "शोध २०२६" उत्साहात
- by Yogesh Bandagale
- March 17, 2026
- 12 views
लवेल : येथील नामांकित घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे १३ व १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव “शोध २०२६” उत्साहात पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील, तसेच डिप्लोमा आणि विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संगणक अभियांत्रिकी एआयएमएल विभागप्रमुख प्रा. एस. डी. लाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विविध महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून घरडा फाउंडेशनचे हेड ऑफ ऑपरेशन्स अँड सोशल इनिशिएटिव्ह्ज श्री. गोपाल थम्पी उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. घरडा यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे स्वप्न आणि त्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील होते. त्यांनी संस्थेमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक आणि तांत्रिक उपक्रमांविषयी माहिती दिली. या तांत्रिक महोत्सवाचे समन्वयक डॉ.अरुण ढंग यांनी आभारप्रदर्शन केले
या दोन दिवसीय महोत्सवामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ग्रीन एनर्जी, इंडस्ट्रियल सेफटी, थ्री-डी प्रिंटिंग, टाऊन प्लॅनिंग यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांवर आधारित विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्याबरोबरच संशोधनात्मक दृष्टीकोन विकसित करण्याची संधी मिळाली.
महोत्सवांतर्गत पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्निकल क्विझ, बिझनेस प्लॅन, इंडस्ट्रियल सेफ्टी चॅलेंज, कॅड मॉडेलिंग आणि सर्किट डिझाईनिंग अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्ष प्रोटोटाइप स्वरूपात सादर करण्याची संधी मिळाली. या महोत्सवामध्ये विविध डिप्लोमा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तसेच अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. त्यांच्यासाठी लॅन गेमिंग आणि बॉक्स क्रिकेट अशा विशेष स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
या तांत्रिक महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला भव्य ऑटो एक्स्पो होय. या ऑटो एक्स्पोमध्ये टाटा मोटर्स, ह्युंदाई, मारुती, होंडा आणि सुझुकी यांसारख्या नामांकित वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या विविध कार आणि दुचाकी मॉडेल्सचे प्रदर्शन मांडले होते. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन वाहनांची माहिती विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे मिळाली. तसेच अनेक स्पोर्ट्स बाइक्स आणि आकर्षक पद्धतीने मॉडिफाइड केलेल्या कार्सचेही प्रदर्शन करण्यात आले होते. वाहनप्रेमींसाठी हा ऑटो एक्स्पो विशेष आकर्षण असल्यामुळे उपस्थितांनी या प्रदर्शनाचा मोठ्या उत्साहात आनंद घेतला.
या महोत्सवामध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षकांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे “शोध २०२६” हा तांत्रिक महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.
