कोकणी लोकसंस्कृती संवर्धनासाठी "आपुलकीचे रिंगण" स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जाकादेवी महिला नृत्य कलापथक वैतागवाडी पेंडखळे, राजापूर मंडळ प्रथम

लांजा (प्रतिनिधी) : कोकणी लोकसंस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने व्हीआयपी श्री प्रोडक्शन व चंद्रकांत खरात यांच्या संयुक्त विद्यमाने "कोकणी लोकसंस्कृती जतन अभियान" हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा पहिला टप्पा म्हणून "आपुलकीचे रिंगण" या नावाने फुगडी, टिपरी व फेऱ्यांच्या पारंपारिक गाण्यांच्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी-शाहीर विकास लांबोरे यांच्या संकल्पनेतून ही आगळीवेगळी स्पर्धा नुकतीच पार पडली.

"गौराईसवे माहेरवाशीनिंचे हसणं जपूया" या अर्थपूर्ण टॅगलाईनसह आयोजित या स्पर्धेला कोकणभरातून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोकणातील विविध भागांतील तब्बल ४२ महिला नृत्य मंडळांनी सहभाग घेतला. महिलांनी पारंपारिक पोशाखात गणपती-गौराईसमोर पारंपरिक गाणी व नृत्य सादर केल्याने कोकणातील घराघरातला सांस्कृतिक वारसा डिजिटल माध्यमातून उजाळा घेऊन आला.

या स्पर्धेचे नियोजन योगेश तुकाराम लांबोरे यांनी केले होते, तर परीक्षणाची जबाबदारी पत्रकार व कलाकार योगेश बांडागळे यांनी पार पाडली. निकालात जाकादेवी महिला नृत्य कलापथक, वैतागवाडी पेंडखळे (राजापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. श्री जुगाजाकाआई महिला नृत्य कलापथक, राजापूर यांना द्वितीय क्रमांक तर कोंडवाडी महिला मंडळ, पन्हाळजे (खेड) आणि संत सखुबाई महिला मंडळ, दाभोळे (विठ्ठलवाडी, सुकमवाडी) यांनी संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक मिळवला. टिपरी नाच मंडळ, सडवली उगवतीवाडी (लांजा) व नवलाई देवी महिला मंडळ, वीवली यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.

सर्व विजेत्या स्पर्धकांचे सादरीकरण कोकणी रितीरिवाज या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांना तेथे पारंपरिक लोकनृत्य पाहता येणार आहे. या उपक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आयोजक चंद्रकांत खरात व कवी-शाहीर विकास लांबोरे यांनी सर्व सहभागी महिला मंडळांचे व कोकणातील रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.
 

संबंधित लेख