नितीन उर्फ आबू ठसाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- by Yogesh Bandagale
- January 20, 2026
- 319 views
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील खेर्डी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन उर्फ आबू ठसाळे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे दाखल केला.
नितीन ठसाळे यांनी विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केली असून महाराष्ट्रीय यादव चारिटी ट्रस्ट, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक काम प्रभावीपणे उभे केले आहे. 2010 मध्ये खेर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. 2014 मध्ये ते खेर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच होते, तर 2017 मध्ये चिपळूण पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच ते वाशिष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक आहेत. 2023 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून नितीन ठसाळे यांनी खेर्डी परिसरात सुमारे 20 ते 22 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असून त्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे.
खेर्डी शहर झपाट्याने विस्तारत असून त्या पार्श्वभूमीवर दर्जेदार पायाभूत सुविधा, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास उपक्रम, तसेच नागरिकांसाठी अधिक सक्षम आरोग्य व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला ठाम मानस असल्याचे ठसाळे यांनी यावेळी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम, रिया कांबळे, अभिजीत खताते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
