विभावरी रजपूत यांचे एल.एल.एम. परीक्षेत यश
- by Yogesh Bandagale
- January 13, 2026
- 146 views
चिपळूण : युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथील १९७८ च्या शालांत परीक्षेच्या बॅचमधील विद्यार्थिनी कु. भारती शिर्के (सध्याच्या श्रीमती विभावरी रजपूत) यांनी शिक्षण क्षेत्रात घेतलेली भरारी खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरली आहे.
नोकरी व संसाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत निवृत्तीनंतर वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी एल.एल.बी. पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. एवढ्यावर न थांबता त्यांनी पुढे एल.एल.एम. या उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला आणि नुकतीच दिलेली एल.एल.एम. परीक्षा त्यांनी पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन यशस्वीपणे पार पाडली.
शैक्षणिक यशासोबतच त्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय असून चिपळूणच्या नाट्य परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणून त्या उत्साहाने सहभाग घेत असतात. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या १९७८ च्या बॅचचे स्नेहसंमेलन यशस्वीरीत्या आयोजित करून जुने ऋणानुबंध जपले.
आजही आपल्या यशाचे श्रेय त्या आपल्या शिक्षकांना देत असून हे यश त्यांच्याशी शेअर करण्याची त्यांची भावना विशेष उल्लेखनीय आहे. कष्टाळू, आनंदी, अत्यंत नम्र स्वभावाच्या आणि अभ्यासू अशा या वकिलीणबाईंचे यश अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक होत आहे.
