चिपळूणमध्ये टीडब्लूजे फसवणूक प्रकरण; २८.५ लाखांचा बळी
- by Yogesh Bandagale
- September 23, 2025
- 68 views
चिपळूण: शहरातील टीडब्लूजे असोसिएट्स कंपनीच्या चार प्रतिनिधींनी गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्ती आणि त्याच्या बहिणीची २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केली असून, चार आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत ही घटना इंटक भवन, पागमळा येथील टीडब्लूजे असोसिएट्सच्या कार्यालयात घडली. पीडित प्रतिक दिलीप माटे (वय २९, रा. कामथे, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी समीर सुभाष नार्वेकर (रा. गुहागर), त्याची पत्नी सी. नेहा नार्वेकर (रा. गुहागर), संकेश रामकृष्ण घाग (रा. चिपळूण) आणि सिद्धेश शिवाजी कदम (रा. कामथे, चिपळूण) यांच्याविरोधात भारतीय दंडसंहिता कलम २१६/२०२५, १८(२), १८(४) आणि १८(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
माहितीनुसार, समीर नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांनी टीडब्लूजे असोसिएट्स कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांच्या माध्यमातून प्रतिक माटे यांचा विश्वास संपादन केला. गुंतवणुकीवर महिन्याला ३ ते ४ टक्के परतावा मिळेल, असा आमिष दाखवून प्रतिक माटे यांनी स्वतः ३ लाख ५० हजार रुपये आणि त्याची बहीण तृप्ती दिलीप माटे यांनी २५ लाख रुपये, एकूण २८ लाख ५० हजार रुपये गुंतवले.
जानेवारी २०२३ पासून ही गुंतवणूक सुरू होती, मात्र मे २०२५ नंतर कंपनीकडून कोणताही परतावा दिला गेला नाही. वारंवार पाठपुराव्यानंतरही मूळ रक्कम परत न मिळाल्याने प्रतिक माटे यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जाणार आहे.
पोलीसांनी नागरिकांना अशा आमिषांवर विश्वास ठेवू नये आणि फसवणुकीच्या घटनांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
