कुणबी समाज एकवटला; हातिव गणात मंगेशदादा बांडागळेंच्या विजयाची खात्री
- by Yogesh Bandagale
- February 06, 2026
- 79 views
आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास; कुणबी समाज महायुतीसोबत
देवरुख (संगमेश्वर) : संगमेश्वर तालुक्यातील हातिव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी–शिवसेना–भाजप महायुतीचे उमेदवार मंगेशदादा बांडागळे यांच्या प्रचाराला कुणबी समाजाने पुढाकार घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. गुरुवारी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत वांझोळे, निगुडवाडी, कासारकोळवण आणि बोंड्ये येथे संवाद बैठका पार पडल्या. या बैठकींना कुणबी समाजासह सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी आपल्या कार्यकाळात कधीही जात-पात न पाहता सर्व समाजासाठी आणि सर्व पक्षातील लोकांसाठी काम केल्याचे सांगितले. संगमेश्वर तालुक्यात पर्यटन, रस्ते, पाखाड्या आदी विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
शास्त्रीपूल–आंबेड येथील कुणबी भवनासाठी तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा निधी, तसेच शेडसाठी वैयक्तिक ५० लाख रुपयांचा निधी दिल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय देवरुख येथील कुणबी शासकीय वसतिगृहासाठी १८ लाख रुपयांचा निधी देऊन कुणबी समाजाच्या प्रगतीसाठी आमदार निकम यांनी मोलाचे योगदान दिल्याचे समाजबांधवांनी बैठकीत आवर्जून सांगितले. समाजासाठीचे हे योगदान कधीही विसरणार नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
उमेदवार मंगेशदादा बांडागळे यांनी जातीपातीचे राजकारण न करता सर्व समाजाला सोबत घेऊन विकासाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. जातीपातीच्या राजकारणामुळे विकास खुंटतो, त्यामुळे सर्व समाज एकत्र येऊन संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू, मार्गदर्शन करू आणि निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकींना जिल्हा परिषदेच्या उमेदवार रूपालीताई कदम, हातिव पंचायत समिती गणातील उमेदवार मंगेशदादा बांडागळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मीताई कदम, भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम, महिला तालुकाध्यक्ष मानसीताई करंबेळे यांच्यासह निधी पंदेरे, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, नितीन भोसले, धोंडू करंबेळे, श्री. तोरस्कर, प्रदीप कांबळे, अनंत जाधव, दीक्षा बांडागळे तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
