नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांसह प्रशासनाचाही विजय!
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 227 views
आखीव–रेखीव नियोजनामागील कणा;
निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे
योगेश बांडागळे
चिपळूण: चिपळूण नगरपालिका निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणुकीत उमेश सकपाळ यांनी नगराध्यक्षपदाची बाजी मारली, तर शिवसेना–भाजप महायुतीला १६ जागा मिळाल्या. मात्र या राजकीय निकालासोबतच या निवडणुकीत प्रशासनही विजयी ठरले, अशी भावना उमेदवारांसह चिपळूणच्या जनतेतून व्यक्त होत आहे.
निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आणि अत्यंत कमी कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल भोसले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दिवस-रात्र मेहनत घेत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक निवडणूक प्रक्रिया यशस्वी केली.
उमेदवारांच्या अर्जांची छाननी, आचारसंहितेची अंमलबजावणी व इतर निवडणूक कामकाज करताना अनेक वेळा अधिकारी व कर्मचारी रात्री एक-एक, दोन-दोन वाजेपर्यंत कार्यरत होते. मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. दरम्यान, मतमोजणी तीन डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
मतदानानंतर तब्बल १९ दिवस मतपेट्या स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर होती. या संपूर्ण कालावधीत कडेकोट सुरक्षा व काटेकोर नियोजनामुळे कोणतीही तक्रार न येता प्रक्रिया पार पडली.
मतमोजणीच्या दिवशीही प्रशासनाचे नियोजन ठळकपणे दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या कठोर भूमिका आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे अवघ्या दीड तासांत सांगितल्याप्रमाणे निकाल प्रक्रिया पूर्ण झाली आणि अत्यंत सुस्पष्ट व पारदर्शक निकाल जनतेसमोर आला.
या निवडणुकीत उमेदवार जिंकलेच, पण निःपक्ष, पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभारामुळे प्रशासनानेही जनतेचा विश्वास जिंकला, असे ठामपणे म्हणावे लागेल. चिपळूण नगरपालिका निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल प्रशासनाच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत.
