पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिपळूण तालुका एकवटला
- by Yogesh Bandagale
- September 30, 2025
- 160 views
चिपळूण: “आपत्तीमध्येही आपलेपण जिवंत आहे” याची साक्ष देत चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मौजे पाकणी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) आणि चिंचपूर बु. (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील पुरपरिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी “एक हात मदतीचा...” या उपक्रमाअंतर्गत अत्यावश्यक साहित्याने सज्ज मदतीची गाडी आज चिपळूणहून रवाना करण्यात आली.
या मदत गाडीचा शुभारंभ आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार जाधव यांनी चिपळूणकरांनी दाखवलेल्या माणुसकीच्या भावनेचे कौतुक करत सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.
या उपक्रमासाठी प्रांताधिकारी श्री. आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी सौ. उमा पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले आणि प्रशासनाच्या इतर अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रांताधिकारी लिगाडे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, व्यापारी, दानशूर व्यक्ती आणि सामान्य नागरिक एकत्र आले.
गेल्या काही दिवसांपासून मदत स्वरूपात आलेल्या वस्तूंचे संकलन, वर्गीकरण आणि पॅकिंग करण्याचे महत्त्वाचे काम स्थानिक कार्यकर्ते, नागरिक आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन पूर्ण केले.
आपत्तीच्या काळात समाजाला एकत्र आणून मदतीची चळवळ उभी करणाऱ्या प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे “एक हात मदतीचा...” हा उपक्रम अधिक प्रभावी ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला माजी सभापती सौ. पूजाताई निकम, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. सचिन कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. बाळा कदम, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
