संध्या दाभोळकर आणि प्रशांत दाभोळकर यांचा चिपळूण अर्बन बँकेतर्फे गौरव
- by Yogesh Bandagale
- October 19, 2025
- 330 views
चिपळूण (प्रतिनिधी) : क्रीडा क्षेत्रात चिपळूणचा झेंडा जगभर फडकवणाऱ्या सौ. संध्या संतोष दाभोळकर आणि श्री. प्रशांत दाभोळकर या दोघांचा चिपळूण अर्बन बँकेच्या वतीने संचालक मंडळाच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
जर्मनीत झालेल्या BMW बर्लिन वर्ल्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सौ. संध्या संतोष दाभोळकर यांनी 42 किलोमीटर अंतर केवळ साडेपाच तासांत पूर्ण केले.
त्यांनी अभिमानाने भारताचा तिरंगा जर्मनीच्या भूमीवर फडकवत चिपळूणसह संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल केले.
त्यांचे हे आंतरराष्ट्रीय यश बॉम्बे रनर्स ग्रुपतर्फे मिळाले असून, आतापर्यंत त्यांनी 200 हून अधिक मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
त्याचप्रमाणे श्री. प्रशांत दाभोळकर यांनी ‘आयर्न मॅन’ हा किताब पटकवला, ही स्पर्धा अलीकडेच कोल्हापूर येथे पार पडली.
या ट्रायथलॉन स्पर्धेत देश-विदेशातील 300 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. ही अत्यंत कठीण स्पर्धा असून, त्यात 1.9 किमी स्विमिंग, 90 किमी सायकलिंग आणि 21.10 किमी धावणे असा क्रम असतो.
ही संपूर्ण शर्यत 10 तासांच्या आत पूर्ण करण्याची अट असते; परंतु श्री. दाभोळकर यांनी ही कठीण शर्यत फक्त 7 तास 46 मिनिटांत पूर्ण करत अवघ्या देशाचे लक्ष वेधले.
दोघांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळातर्फे त्यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
बँकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी दाभोळकर दाम्पत्याचे कौतुक करत सांगितले की, “ही केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण चिपळूण शहराची आणि कोकणाची अभिमानास्पद उपलब्धी आहे.”
कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी दाभोळकर यांनी बँकेच्या आणि नागरिकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत,
“शिस्त, सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवल्यास कोणतेही लक्ष्य अशक्य नाही,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
