वैभव खेडेकरांच्या भाजपप्रवेशावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
- by Yogesh Bandagale
- October 03, 2025
- 265 views
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कोकणातील माजी खंदे समर्थक आणि मनसेतून बडतर्फ झालेले वैभव खेडेकर यांचा दोन वेळा रद्द झालेला आणि तिसऱ्यांदा होऊ घातलेला भाजपप्रवेश हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. यावर आता शिवसेना नेते व रत्नागिरीचे पालकमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.
रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले, “एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश हा तीन-तीन वेळा रद्द होणं म्हणजे खच्चीकरण होणं आहे. ते होऊ नये, ही माझी भूमिका आहे. वैभव खेडेकर हे समाजामध्ये तळागाळात जाऊन काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. मात्र त्यांचा प्रवेश का रद्द झाला, हे मला कळलेलं नाही.”
खेडेकर तुमच्या शिवसेनेत आले तर आपण प्रवेश देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सामंत म्हणाले, “आपण भाजपबद्दल बोलतो आहोत, खेडेकर भाजपात जात आहेत ना, मग त्यांच्याजवळ बोला. ते आले तर मला सांगा. मी भेट घेईन. मात्र माझ्याकडे आले तर प्रवेश तीन वेळा रद्द होणार नाही, याची हमी देतो.”
दरम्यान, चिपळूण येथील उद्योगपती व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेले प्रशांत यादव तुमच्याकडून कसे सुटले, असा मिश्कील प्रश्न विचारला असता सामंतांनी “सोडले” असे उत्तर देत टोला लगावला. “शेवटी कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं एवढं राजकीय ज्ञान मला नक्कीच आहे,” असं सामंत म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य करताना सामंत म्हणाले, “जिल्ह्यात शिवसेनेची ताकद प्रत्येक तालुक्यात आहे. आम्ही कोणालाही कमी लेखणार नाही. शिवसेना ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपासोबत युती करूनच पुढे जाणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
