अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा: संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
- by Yogesh Bandagale
- January 02, 2026
- 71 views
सातारा :मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी बिघडलेले गाव सुधारण्यासाठी पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते असे विधान करून एका वेगळ्याच सामाजिक चर्चेचा बार उडवून दिला आहे. मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी कुलकर्णी व जोशींनी केली. त्यामुळे बिघडलेले गाव सुधारायचे असेल तर पाटील व कुलकर्ण्यांना युती करावीच लागते, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची साहित्य व राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. विश्वास पाटलांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्याचीही मागणी केली.
विश्वास पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत साताऱ्याची गौरवगाथा मांडली. ते म्हणाले, साहित्य संमेलन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो, तो आचार, विचार व देशाला दिशा देण्याचा कार्यक्रम असतो. मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात काँग्रेसची स्थापना होण्याच्या अगोदरपासून झाली. आज एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केले ही एक मोठी गोष्ट आहे.
मी शब्दांच्या फडात रमणारा पाटील
सातारच्या 99 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपण एका पाटलाला बोलावले आहे. पाटील हे आडनाव घेतले की 3 फड डोळ्यापुढे उभे राहतात. कुस्तीचा फड, तमाशाचा फड व उसाचा फड. पण तुमच्यासमोर बोलणारा हा पाटील फक्त शब्दांच्या फडामध्ये रमणारा आहे. इथे 99 व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी व कुलकर्णींनी केली. तुम्हाला माहिती आहे की बिघडलेले गाव सुधारायचे असेल तर पाटील व कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. ही आपली जुनी वहिवाट आहे, असे ते म्हणाले.
अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या
विश्वास पाटील पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर 87 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असे म्हणाले होते. त्यांचे हे वाक्य फार गाजले. पण त्यांनी पुढे जाऊन असेही सांगितले की, मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे. त्यावेळी त्यांनी माय मराठीचा पुरस्कार केला. त्यामुळे ज्या - ज्यावेळी मराठी भाषेवर संकट येते त्या - त्या वेळी आम्ही साहित्यिक लढा देतो. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोरारजी देसाईंनी आमच्या आचार्य अत्रेंना 70 दिवस तुरुंगात टाकले होते. अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते.
कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिंहासनासमोर झुकत नाहीत हे या साहित्यिकांनी दाखवून दिले आहे. मी अण्णाभाऊ साठे यांच्यावर बेसिक काम केले. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी आमची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मराठी साहित्यातील दलित साहित्य हे वाखणण्याजोगे आहे, असेही विश्वास पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
