सावर्डेत अपघाताच्या कारणावरून तरुणाचे अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- by Yogesh Bandagale
- April 09, 2026
- 117 views
सावर्डे : सावर्डे बाजारपेठेत अपघाताच्या कारणावरून २० वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला बंदिस्त ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाणे यांनी मुंबईतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघा मारुती शिंगरे (रा. बिडलीनगर, कणकवली) यांचा मुलगा सिद्धेश शिंगरे हा ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सावर्डे बाजारपेठेतून जात असताना त्याचा आरोपींच्या गाडीशी अपघात झाला. या अपघातातील नुकसान भरपाईच्या कारणावरून आरोपी तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड आणि विनोद टक्के (सर्व रा. मुंबई) यांनी सिद्धेशला जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतले.
आरोपींनी त्याला एका ठिकाणी डांबून ठेवत नातेवाईकांकडे पैशांची मागणी सुरू केली. सिद्धेशच्या सुटकेसाठी आरोपींनी वेळोवेळी १८ हजार, २५ हजार आणि पुन्हा २५ हजार रुपये उकळले. मात्र, इतकी रक्कम देऊनही त्याची सुटका न करता आरोपींनी आणखी १ लाख २५ हजार रुपयांची मागणी करत ‘पैसे द्या आणि मुलाला घेऊन जा’ अशी धमकी दिली.
मुलगा परत न आल्याने अखेर मेघा शिंगरे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार सावर्डे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
