पाणी टंचाईवर मात करण्यासाठी समन्वयाने काम करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. ९ : जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी सादरीकरणाद्वारे टँकरची आवश्यकता, टंचाई निवारण उपाययोजना व प्रस्तावित कामांची माहिती दिली. यानंतर पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.

यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, ज्या गावांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे, तेथे तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा. अपूर्ण नळपाणी योजना लवकर पूर्ण कराव्यात आणि त्यावर नियमित देखरेख ठेवावी. विंधन विहिरींची कामे वेगाने पूर्ण करण्यासोबतच आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजन निधीतून नवीन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पुढील वर्षापासून पाणी टंचाई आराखड्याला डिसेंबरमध्येच मंजुरी देऊन जानेवारीपासून कामे सुरू करण्याचे नियोजन करावे. कमी पाऊस किंवा उशिरा पावसाची शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच टँकर व विहीरधारकांची देयके प्रलंबित न ठेवता तातडीने अदा करण्याच्या सूचनाही दिल्या.

बस स्थानकांचा आढावा

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामाचाही आढावा घेतला. प्रलंबित कामे लवकर पूर्ण करून दर्जेदार बांधकाम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बस डेपोतील सुविधा, स्वच्छता, चालक-वाहकांच्या निवास व्यवस्था आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या थांब्यांबाबतही त्यांनी माहिती घेतली.

देवरुख बस डेपोतील अडचणींची माहिती घेतल्यानंतर लवकरच तेथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मालगुंड येथे प्रस्तावित प्राणी संग्रहालयाच्या कामाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

संबंधित लेख