चिपळूणमध्ये विजेचा शॉक लागलेल्या माकडावर कुत्र्यांचा हल्ला

चिपळूण | प्रतिनिधी: चिपळूण तालुक्यातील खेर्डी माळेवाडी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या माकडावर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. मात्र स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या माकडाचे प्राण वाचले आहेत.

खेर्डी माळेवाडी परिसरात नदीकिनारी माकडांचा तसेच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नेहमीच आढळून येतो. नुकतेच एका माकडाला विजेचा शॉक लागल्याने तो खाली कोसळला. याच संधीचा फायदा घेत भटक्या कुत्र्यांनी माकडावर झडप घालून त्याला गंभीर जखमी केले.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या माळेवाडीतील वाघुळदे कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत तात्काळ हस्तक्षेप केला. कुत्र्यांच्या तावडीतून माकडाची सुटका करून त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर जखमी माकडाला प्राणीप्रेमींच्या ताब्यात देण्यात आले, जेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या प्रसंगी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका मुक्या जीवाचे प्राण वाचले असून, वाघुळदे कुटुंबीय व मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
 

संबंधित लेख