वाशिष्ठीतर्फे तिखट पदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Yogesh Bandagale
- January 09, 2026
- 200 views
चिपळूण : चिपळूण सावरकर मैदानात सुरू असलेल्या कृषी व पशू प्रदर्शनात वाशिष्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिखट पदार्थांची स्पर्धा आज शुक्रवारी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तब्बल ४० महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या नाविन्यपूर्ण आणि पौष्टिक तिखट पदार्थांचे सादरीकरण केले.
या स्पर्धेचे उद्घाटन वाशिष्टीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धक महिलांना तिखट पदार्थ तयार करण्यासाठी एक तासाचा कालावधी देण्यात आला होता. यामध्ये पनीर बिर्याणी, कानकेचे मामोज केक, शेवग्याच्या फुलांचे खुसखुशीत थालीपीठ, प्रोटीन व फायबरयुक्त मोड आलेल्या कडधान्याचे आपे, मटका पनीर बिर्याणी, सलादयुक्त शाही फ्लॅटर, चीज पनीर व्हेज रोल, दही कबाब, मटार पनीर बॉल, बीट रूट तिखी मटार पनीर बॉल, एग्ज डेव्हिल आदी विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थ सादर करण्यात आले.
स्पर्धेतील पदार्थांची चव, मांडणी, सजावट, स्वच्छता आणि नाविन्यपूर्णता या निकषांवर परीक्षक अंजली केळकर व मीना पवार यांनी परीक्षण केले. सर्वच महिलांनी एका पेक्षा एक सरस पदार्थ तयार केल्याने परीक्षकांनाही निर्णय घेताना कसरत करावी लागली.
या स्पर्धेतील सर्व सहभागी महिलांचा सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिलांच्या पाककौशल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
