चिपळूणमध्ये ‘द फोक आख्यान’चा लोककलेचा भव्य आविष्कार

चिपळूण (योगेश बांडागळे): महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेला आधुनिक आणि तरुणाईला भावेल अशा स्वरूपात सादर करणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ‘द फोक आख्यान’ (The Folk Aakhyan) चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक लोककला, लोकसंगीत आणि लोककथांचा सुरेख संगम असलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

गवळण, भारूड, लावणी, पोवाडा, लोकनृत्य, गोंधळ तसेच ढोल-ताशांच्या गजरातून साकारलेले सादरीकरण हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले. मूळ लोककलेचा गाभा जपत आधुनिक प्रकाशयोजना, संगीत संयोजन आणि नाट्यमय मांडणीमुळे ‘फोक आख्यान’ हा केवळ कार्यक्रम न राहता एक समृद्ध सांस्कृतिक अनुभव ठरला.

या कार्यक्रमातील सर्व गीते व संवाद ईश्वर अंधारे यांनी लिहिले असून, त्यांना हर्ष-विजय यांनी दिलेले आधुनिक आणि तरीही लोकसंगीताची आत्मा जपणारे संगीत विशेष भावले. चिपळूणचा सुपुत्र मानस साखरपेकर याने हार्मोनियमवर दिलेली साथ ही कार्यक्रमाची आणखी एक जमेची बाजू ठरली.
लोककलेला नवे कंगोरे देत मराठी मातीशी नाते घट्ट करणाऱ्या या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. तरुणाईसह सर्व वयोगटातील रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी सभापती पूजा निकम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा वारसा जपत त्याला आधुनिक स्वरूप देणारा ‘द फोक आख्यान’ हा कार्यक्रम चिपळूणमध्ये यशस्वीपणे संपन्न झाला असून, लोककलेच्या संवर्धनासाठी तो एक प्रभावी आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.
 

संबंधित लेख