साजिद सरगुरोह, शुभम पिसे, निहार कोवळे सर्वात तरुण नगरसेवक
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 600 views
चिपळूण (योगेश बांडागळे): चिपळूण नगर पालिका निवडणूक या वेळी अनेक अर्थांनी आगळीवेगळी ठरली असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम नगर पालिकेत दाखल झाली आहे. तरुण नेतृत्वामुळे आगामी काळात शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
या निवडणुकीत शशिकांत मोदी चौथ्यांदा नगर पालिकेत निवडून आले असून रसिका देवळेकर यांनी दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून प्रवेश केला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ हेही दुसऱ्यांदा नगर पालिकेत जात असून त्यांच्यासोबत तरुण नगरसेवकांची भक्कम टीम काम करताना दिसणार आहे.
काँग्रेसचे प्रभाग २चे साजिद सरगुरोह हे सर्वात तरुण नगरसेवक ठरले आहेत. वयाच्या २९व्या वर्षी ते नगरसेवक झाले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक १२ मधून विजयी झालेले शुभम दयानंद पिसे हे या निवडणुकीतील विशेष आकर्षण ठरले आहेत. अवघ्या ३०व्या वर्षी १५०व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिपळूण नगर पालिकेचे नगरसेवक होण्याचा मान त्यांना मिळाला असून हे दोघे नगर पालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक ठरले आहेत.
तसेच ३३व्या वर्षी निहार कोवळे यांनी नगर पालिकेत प्रवेश केला आहे. एकूणच चिपळूण नगर पालिकेतील नगरसेवकांचे सरासरी वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास असून, तरुणाईकडे विकासाची धुरा सोपवली गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
तरुण नगराध्यक्ष आणि बहुतांशी तरुण नगरसेवकांची टीम यामुळे चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवे विचार, नवी ऊर्जा आणि गतिमान निर्णयप्रक्रिया अपेक्षित असून नागरिकांकडून या तरुण नेतृत्वाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
