अभिरुची देवरुख आयोजित ‘स्वरोत्सव’ संगीत महोत्सवास दमदार सुरुवात
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 37 views
सुरेश सप्रे / देवरुख : अभिरुची देवरुख आयोजित ‘स्वरोत्सव’ या वार्षिक संगीत महोत्सवाची सुरुवात देवरुख येथील पित्रे प्रायोगिक कलामंच येथे अत्यंत भक्तीपूर्ण व रसिकतेने भरलेल्या वातावरणात झाली. ग्वाल्हेर, पतियाळा तसेच किराणा घराण्याची गायकी आत्मसात केलेले सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने या महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली.
कोकणगंधर्व स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आर्ट सर्कलचे माजी अध्यक्ष जयंत प्रभुदेसाई, प्रमुख प्रायोजक सुमधूर मेवा प्रॉडक्ट्सचे उदय भिडे, संदीप गानू, शर्दूल गानू, वनाझ इंजिनिअर्सचे विलास पुरोहित, यशोदीप कयाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पं. व्यंकटेश कुमार यांची चतुरस्त्र, दमदार व भावपूर्ण गायकी, तबला व हार्मोनियमची उत्कृष्ट संगत आणि रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे स्वरोत्सव २०२६ ची प्रभावी सुरुवात झाली. या मैफिलीत देवरुखसह साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, देवगड व सावंतवाडी येथील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीत मैफिलीचा मनमुराद आस्वाद घेतला.
या कार्यक्रमात प्रशांत पांडव यांनी तबल्यावर, तर सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनियमवर अत्यंत समरस साथसंगत केली.
अभिरुचीच्या वतीने सर्व रसिकांचे स्वागत व कलाकार परिचय महेश उर्फ अप्पा आठल्ये आणि मंगेश प्रभुदेसाई यांनी केले. याप्रसंगी कोकणगंधर्व स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर यांच्या हस्ते पं. व्यंकटेश कुमार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्वरोत्सवासाठी विशेष सहकार्य करणारे गोविंदराव बेडेकर तसेच प्रमुख प्रायोजक उदय भिडे (सुमधूर मेवा प्रॉडक्ट्स) यांचा अभिरुचीचे अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
आज व्हायोलिन वादनाची मैफल
आज, शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी पं. विद्युत मिश्रा यांचे पट्टशिष्य, सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक मनास कुमार यांची व्हायोलिन वादनाची मैफल सादर होणार असून, त्यांना तबल्यावर तनय रेगे साथ करणार आहेत.
अभिरुची देवरुख तर्फे जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून स्वरोत्सव संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
