चिपळुणातून पैशांच्या वादातून तरुणाचे अपहरण
- by Yogesh Bandagale
- April 09, 2026
- 169 views
चिपळूण : शहरातील काविळतळी परिसरातील राहुल गार्डन येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून २९ वर्षीय तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाणे येथे सातारा जिल्ह्यातील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश मार्तंडराव पवार (वय ७०) यांचा मुलगा शुभम पवार याच्यात आणि सौरभ चव्हाण व वैभव साकंडे (दोन्ही रा. लोणंद, जि. सातारा) यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद होता.
बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शुभम याला फोन करून राहुल गार्डन इमारतीखाली बोलावून घेतले. यावेळी शुभमसोबत त्याचे वडीलही उपस्थित होते. मात्र, आरोपींनी अचानक शुभम याला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून तेथून पळ काढला.
या घटनेनंतर प्रकाश पवार यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सौरभ चव्हाण आणि वैभव साकंडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून अपहृत शुभम पवार याचा शोध सुरू आहे.
