चिपळूणचे ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान शिमगा महोत्सव

चिपळूण : चिपळूण शहराचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिमगा महोत्सव फाल्गुन पौर्णिमा सोमवार दि. २ मार्च ते फाल्गुन कृष्ण सप्तमी मंगळवार दि. १० मार्चपर्यंत मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा केला जाणार आहे.

अखिल महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जाणाऱ्या चिपळूणच्या शिमगा उत्सवातील प्रमुख उत्सवमूर्ती श्री जुना कालभैरव मंदिर, श्री देवी जोगेश्वरी, श्री देव केदार व श्री देवी जाखमाता यांच्या चतु:सिमा पालखी मिरवणुकीचा विस्तृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

प्रमुख कार्यक्रम

दि. २ मार्च (सोमवार)

रात्री ९ वा. दै. सागर रंगमंच येथे लावणी कार्यक्रम – “लावण्यवती अप्सरा”

रात्री १२.३० वा. होळी पूजा व होम प्रज्वलन

रात्री १२.३५ वा. विघ्नहर्ता ग्रुपचे पुणेरी ढोल-ताशा पथक सादरीकरण

रात्री १.३० वा. ‘श्रीं’ची सहाण भरणे व त्यानंतर पालखी प्रस्थान

दि. ३ मार्च

सकाळी चतुःसिमा धुळवट

दि. ४ ते ६ मार्च

श्री देवी भवानी व श्री देवी विंध्यवासिनी भेट सीमा

विविध भागांत पालखी मिरवणूक, आरत्या व धार्मिक विधी

कर्दे, शंकरवाडी, ओझरवाडी, शिवाजीनगर, बाजारपेठ, उक्ताड आदी भागांत स्वारी

दि. ६ व ७ मार्च

खेंड, उक्ताड व बाजार चव्हाटा सीमा

विशेष आकर्षण : वैश्यवसाहतीतील श्री देव केदार मंदिरातून ढोल-ताशे, सनई व विद्युत रोषणाईयुक्त अंबारीसह सुशोभित हत्तीची मिरवणूक

दि. ८ मार्च

सायं. ५.३० वा. चतुःसिमा रंगपंचमी

रात्री १०.३० वा. चव्हाटा कार्यक्रम (जुनी खाटीक गल्ली, बाजारपेठ)

दि. ९ मार्च

सकाळी १० वा. श्री देव कालभैरव लळीत

रात्री ११ वा. श्री भैरी-जोगेश्वरी-केदारनाथ भजनी भारुड व नमन नाट्य कार्यक्रम (स्थळ : श्री केदारेश्वर मंदिर, वैश्यवसाहत)

दि. १० मार्च

दुपारी १२ वा. श्री देव केदारेश्वर लळीत कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता

भक्तांना आवाहन

पालखी मिरवणूक नियोजित मार्गाने रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे. नवसाच्या नारळावर पालखी बसवायची असल्यास पूर्वसूचना विश्वस्त मंडळास द्यावी. देणगी व वर्गणी फक्त देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत पावतीधारकाकडेच जमा करावी.

मंदिर जिर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात असून भक्तांनी सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. किशोर शेटये, श्री. समीर शेटये, सचिव श्री. पंकज कोळवणकर, सेवेकरी विश्वस्त श्री. सुमता शिदे, श्री. चंद्रशेखर लाड व शिमगोत्सव समिती अध्यक्ष श्री. दिनेश श्रीकृष्ण देवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

शिमगा महोत्सवात नागरिकांनी आनंदाने व उत्साहाने सहभागी होऊन परंपरेचा मान राखावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख