फरशीनाका येथे मध्यरात्री भीषण अपघात; कारची एसटीला धडक, चालक जखमी
- by Yogesh Bandagale
- February 12, 2026
- 139 views
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील फरशीनाका परिसरात मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पुढील वाहनाला बाजू काढण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक जखमी झाला असून कार व एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गोपिनाथ राणे हे कार चालक जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोरिवली ते कणकवली या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचे चालक शिवराम सुधाकर राणे (रा. कणकवली) होते.
एसटी बस फरशीनाका येथील पुलाजवळून जात असताना कार चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक भरधाव वेगात कार वळवली. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला रुग्णालयात हलवून अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चिपळूण पोलिसांकडून सुरू आहे.
