चिपळूण शहर स्वच्छ ठेवणाऱ्या दहा कर्मचाऱ्यांचा सन्मान

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित पाच दिवसीय दशकपूर्ती कीर्तनमालेच्या सांगता समारंभात चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या चिपळूण नगरपालिकेतील दहा स्वच्छता कर्मचारी बंधूंचा ह.भ.प. श्री आफळेबुवा यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

चिपळूण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील मनोहर काशिराम कांबळे, लक्ष्मण भागुराव जाधव, दयानंद बबन मोहिते, सुनील नारायण नेवाले, अनिल अनंत जाधव, उमेश बुद्धदास मोहिते, ओंकार श्रीकांत रामाणे, अनिल शिवराम खापरे, अमोल रमेश गमरे व दीपक तुकाराम कदम या दहा कर्मचाऱ्यांना विशेष निमंत्रित करून कीर्तनमालेच्या सांगता कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या वतीने संस्थेचे विश्वस्त सदस्य श्री. सुनील सावंत यांच्या हस्ते डॉ. पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कीर्तनमाला उपक्रमासाठी सदैव सहकार्य करणारे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निहार कोवळे व सौ. रसिका देवळेकर, कीर्तनात तालवाद्याची साथ देणारे ह.भ.प. श्री. संकेत भोळे यांचा आयोजक परिवाराचे श्री. देवेंद्र रेडीज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच दरवर्षी वृत्तपत्र माध्यमातून कीर्तनमालेच्या वृत्तांकनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या श्रीमती विशाखा चितळे व श्री. शरद तांबे यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. समीर वासुदेव दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी स्वामी चैतन्य परिवाराने दशकपूर्तीचे औचित्य साधून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आगळावेगळा सन्मान केल्याबद्दल विशेष कौतुक केले. मागील दहा वर्षांपासून चिपळूणवासीयांना ह.भ.प. आफळेबुवांच्या अभ्यासपूर्ण व चिंतनशील कीर्तनाचा लाभ मिळत असून, स्वामी चैतन्य परिवार हे नव्या पिढीला संस्कार देणारे आदर्श व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

कीर्तनमालेच्या सांगता पुष्पात आफळेबुवांनी तरुण पिढीला भ्रष्टाचार व व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. पाचही दिवस पेशवाईच्या ज्ञात व अज्ञात इतिहासाचे सखोल व अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले. कीर्तनमालेच्या सांगतेनंतर रसिक श्रोत्यांनी सांस्कृतिक केंद्रातून बाहेर पडताना आयोजकांचे मनोमन आभार मानले.

कार्यक्रमाचे समयोचित, नेटके सूत्रसंचालन श्री. विजय (नाना) परचुरे यांनी केले. विनामूल्य स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या कीर्तनमाला उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या दाते, संस्था व प्रसारमाध्यमांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

संबंधित लेख