रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त रॅली

नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी, दि. ७ (जिमाका) : नागरिकांनी रस्त्यावरून चालताना तसेच वाहन चालविताना रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन तसेच रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते मिरकरवाडा या मार्गावर आज रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले की, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे यासारख्या धोकादायक सवयी टाळल्या पाहिजेत. रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता वाहनचालकांनी घ्यावी. तसेच योग्य पद्धतीने वाहन पार्किंग करणे हेही रस्ता सुरक्षेचा महत्त्वाचा भाग असून नागरिकांनी या सर्व नियमांचे पालन करावे. समाज, कुटुंब व मित्रपरिवारामध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रत्येकाने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, जेणेकरून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे सांगितले. रस्ता सुरक्षेचे नियम पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी वाहन चालविताना वाहतूक शिस्त आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. दुचाकी चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट वापरणे आवश्यक आहे. अतिवेगाने वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये तसेच दारू पिऊन वाहन चालवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यावर वाहन चालविताना स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी आणि रत्नागिरी जिल्हा अपघातमुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या रॅलीमध्ये पोलीस विभाग तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख