श्वेता बंदरे–कामेरकर यांना सर्वोत्तम मुख्याध्यापिका पुरस्कार

देवरुख (सुरेश सप्रे): नेरुळ येथील गुरुवर्य बाळाराम पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. श्वेता विकास बंदरे–कामेरकर यांना स्टार एज्युकेशनतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सौ. श्वेता बंदरे–कामेरकर या मूळच्या संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावच्या सुकन्या असून सध्या त्या मुंबई–नेरुळ येथील गुरुवर्य बाळाराम पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टार एज्युकेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

त्यांचे शालेय शिक्षण कै. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली येथे झाले. पुढे त्यांनी देवरूख येथील आठल्ये–सप्रे कॉलेजमधून बी.ए. पदवी प्राप्त केली, तर साडवली येथील पराग बी.एड. कॉलेजमधून बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.

नेरुळ येथील बाळाराम पाटील स्कूलमध्ये त्यांनी प्रथम शिक्षिका म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर मुख्याध्यापिका पदावर कार्यरत असताना त्यांनी सर्व सहकारी शिक्षकवर्गाला विश्वासात घेऊन शाळेचा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. मागील दहा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शैक्षणिक संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्टार एज्युकेशन संस्थेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वीही त्यांना लोकमत समूहाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या यशाबद्दल स्टार एज्युकेशनचे अध्यक्ष संदीप पाटील, माजी मंत्री रवींद्र माने, पराग संस्थेचे सचिव व माजी आमदार सुभाष बने, संचालक पराग बने, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सप्रे, देवरूख शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संगमेश्वर तालुक्यासह नवी मुंबई व नेरुळ परिसरातून सौ. श्वेता बंदरे–कामेरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

संबंधित लेख