गुहागरच्या वीकेंड ट्रिपवर अनर्थ; समुद्रात पोहायला उतरताच तिघे बुडाले

गुहागर : ख्रिसमस व नववर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रात पोहायला उतरलेल्या मुंबईतील सॉफ्टवेअर इंजिनियर अमुल विजयकुमार मुत्था (जैन) (वय ४२, रा. पवई, मुंबई) यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

समुद्रकिनाऱ्यावर पोहताना आवश्यक ती काळजी न घेतल्यास जीवितहानी होऊ शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेमुळे आली आहे.

गुहागर समुद्रकिनारी तीन पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. मात्र अचानक आलेल्या मोठ्या आणि जोरदार लाटेमुळे हे तिघेही पर्यटक समुद्रात ओढले गेले. काही क्षणातच तिघेही बुडू लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली.

स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतकार्य सुरू केले. या तीन पर्यटकांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध असलेल्या जेटस्कीच्या मदतीने बुडणाऱ्या व्यक्तींना किनाऱ्यावर आणण्यात आले.

मात्र अमुल मुत्था यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित दोघांना वाचवण्यात यश आले.

या घटनेमुळे गुहागर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटकांनी समुद्रात उतरताना सुरक्षा सूचना, लाल झेंडे आणि स्थानिक मार्गदर्शनाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासन व स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित लेख