विकासाच्या नव्या वाटेवरचा 'किंगमेकर' : प्रशांत यादव साहेब

 रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक पटावर गेल्या काही वर्षांत ज्या नेतृत्वाने सातत्याने आपली ठळक छाप उमटवली, त्या वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रशांत बबन यादव यांचा ५ जानेवारी रोजी वाढदिवस. संघर्षातून घडलेले, सहकाराच्या माध्यमातून समृद्धी घडवणारे, निवडणुकांमध्ये रणनीतीने विजय मिळवणारे आणि चिपळूणला स्मार्ट सिटी बनवण्याचा ठाम संकल्प बाळगणारे प्रशांत यादव आज विकासाचा विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखले जात आहेत. चिपळूण नगरपालिका निवडणुकीत विकासाचे व्हिजन घेऊन भाजप-शिवसेना-रिपाइं युतीचे नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकसंघ ठेवून ज्या पद्धतीने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली, रणनिती आखली ती चिपळूण नगरपालिका निवडणुकीत महायुतीला विजयाच्या दिशेला देणारी ठरली. या घवघवीत यशामुळे त्यांची 'किंगमेकर' म्हणून नवी 'इमेज' तयार झाली. विकासाच्या नव्या वाटेवरील या उमद्या नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा...
 
संघर्षातून घडलेले नेतृत्व
               ५ जानेवारी १९७५ रोजी चिपळूण तालुक्यातील खेर्डी माळेवाडी येथे जन्मलेल्या प्रशांत यादव यांचे बालपण सर्वसामान्य परिस्थितीत गेले. मात्र लहानपणापासूनच त्यांनी वाचन, वक्तृत्व, संघटन आणि नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली. आर्किटेक्चर पूर्ण केल्यानंतर सुरक्षित नोकरीचा मार्ग न स्वीकारता स्वतःच्या कष्टावर उभे राहण्याचा आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.
               वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी खेर्डी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येत त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. उपसरपंच व सरपंच म्हणून काम करताना पारदर्शकता, शिस्त आणि लोकहित या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. जवळपास १५ वर्षांच्या ग्रामपंचायत कारकिर्दीत एकही वाद किंवा आरोप न लागणे ही त्यांच्या स्वच्छ प्रतिमेची साक्ष आहे. “सत्तेत राहूनही प्रामाणिकपणा जपता येतो” हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

शेतकऱ्यांचा भक्कम आधार – वाशिष्ठी डेअरी
               राजकारणासोबतच शेतकरी आणि तरुणांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांचे सासरे आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने प्रशांत यादव यांच्या खांद्यावर दिली. त्यांनी पत्नी सौ. स्वप्ना यादव यांच्या भक्कम साथीने आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर ही जबाबदारी चोख पार पाडली. “कोकणात डेअरी प्रकल्प यशस्वी होत नाहीत” हा समज खोटा ठरवत ७ सप्टेंबर २०२१ रोजी भूमिपूजन झालेला हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभा राहिला. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आणि उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते प्रत्यक्ष उद्घाटन झालेल्या या डेअरीने पहिल्या दिवशी ५०० लिटर दूध संकलन केले. आज हा आकडा सुमारे ६० हजार लिटरपर्यंत पोहोचला आहे. १३ हजार २०८ हून अधिक शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले असून हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. पत्नी सौ. स्वप्ना यादव यांची खंबीर साथ, सहकाराची तत्त्वे, पारदर्शक कारभार आणि दर्जेदार उत्पादनांवर दिलेला भर यामुळे वाशिष्ठी डेअरी आज कोकणातील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ बनली आहे.

सलग तिसरे कृषी व पशु प्रदर्शन
               वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून केवळ नफ्याचा विचार न करता शेतकरी अधिक प्रगत, शिक्षित व्हावेत, नवी पिढी शेतीकडे वळावी, या उद्देशाने वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून दरवर्षी कृषी व पशु प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 5 जानेवारी रोजी या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले जाते. यंदाचे या प्रदर्शनाचे तिसरे वर्ष आहे. वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक आणि प्रशांत यादव यांच्या सहचारिणी अर्थात 'मॅनेजमेंट गुरू' सौ. स्वप्ना यादव मॅडम आणि त्यांचे सहकारी या प्रदर्शनासाठी मेहनत घेत आहेत. 5 ते 9 जानेवारी या कालावाधित हे प्रदर्शन होत आहे. शेतकरी, कृषिप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर लाखोंच्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देतात. संपूर्ण कोकणातील हे एकमेव भव्य कृषी प्रदर्शन अवघ्या महाराष्ट्रात नावाजले जाते. यंदाही त्याच दिमाखात हे प्रदर्शन आणखी आगळ्या-वेगळ्या आणि भव्य स्वरूपात यशस्वी होईल, यात तिळमात्र शंका नाही.

नव्या संघर्षाची यशस्वी वाटचाल
               सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश केलेल्या प्रशांत यादव यांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून संघटन मजबूत केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून अल्पावधीतच प्रदेश सरचिटणीसपद मिळवले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघात जोरदार लढत दिली. केवळ ६ हजार मतांनी पराभव, मात्र ९० हजार मतदारांचा विश्वास त्यांनी मिळवला. पराभवानंतरही खचून न जाता “हा पराभव नाही, तर नव्या संघर्षाची सुरुवात आहे” असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

विश्वास आणि नेतृत्वाची कसोटी!
               प्रशांत यादव यांनी 19 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेशानंतर प्रथमच झालेल्या चिपळूण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची युती असलेल्या या निवडणुकीत त्यांनी नियोजन, शिस्त आणि संघटनकौशल्याचा उत्तम वापर केला. स्थानिक नेते,
आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध समाजघटकांची एकसंध मोट बांधत त्यांनी बूथनिहाय नियोजन, प्रभावी संवाद आणि परिणामकारक रणनीती आखली. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले आणि २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल लागला. हा निकाल भाजपसह शिवसेनेतही नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.

'किंगमेकर'ची छाप!
                विरोधात माजी मंत्री व आमदार, माजी आमदार आणि विद्यमान आमदार अशी बलाढ्य फळी असतानाही युतीने चिपळूण नगरपालिका निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवले. महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह भाजपचे ७ आणि शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले. “चिपळूण नगरपालिका निवडणुकीत प्रशांत यादव किंगमेकर ठरले... गेम चेंजर ठरले” अशी चर्चा चिपळूणच्या राजकीय वर्तुळात रंगली. प्रचंड संयम ठेवत 'परफेक्ट नियोजन' आणि 'करेक्ट कार्यक्रम' कसा केला जातो, हे प्रशांत यादव यांनी दाखवून दिले, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

चिपळूण स्मार्ट सिटीचा ठाम संकल्प
               प्रशांत यादव यांचा राजकीय दृष्टिकोन केवळ निवडणुकांपुरता मर्यादित नाही. चिपळूणला आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख “स्मार्ट सिटी” बनवण्याचा ठाम संकल्प त्यांनी जाहीरपणे मांडला आहे.
सुसज्ज रस्ते, दर्जेदार पाणीपुरवठा, आधुनिक ड्रेनेज व्यवस्था, डिजिटल प्रशासन, वाहतूक व्यवस्थापन, हरित क्षेत्रांचे संवर्धन, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रे आणि महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक सुविधा असा सर्वसमावेशक विकास आराखडा त्यांच्या दृष्टीसमोर आहे.
चिपळूण हे केवळ तालुक्याचे ठिकाण न राहता कोकणातील आदर्श स्मार्ट शहर म्हणून उभे राहावे, रोजगारनिर्मितीचे केंद्र बनावे आणि नव्या पिढीसाठी संधींचे दालन उघडावे, हीच त्यांची भूमिका आहे.

विकासाचे व्हिजन आणि पुढील वाटचाल
               मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार मा. रविंद्रजी चव्हाण साहेब, खासदार मा. नारायणजी राणे साहेब आणि मंत्री ना. नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोकणात विकासाची नवी दिशा दिली आहे. या विकासप्रवाहात स्थानिक नेते, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने प्रशांत यादव यांचे सहकार, संघटन आणि स्मार्ट सिटीचे व्हिजन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
               प्रशांत यादव हे केवळ एक राजकीय नेता नसून कोकणातील हजारो कुटुंबांच्या आशा, तरुणांच्या स्वप्नांचा आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाच्या उज्ज्वल भवितव्याचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना, चिपळूण स्मार्ट सिटीचा संकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरावा आणि कोकणच्या विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे जावा हीच सर्वसामान्यांची भावना आहे आणि ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ आणि निरोगी दीर्घायुष्य देवो, हीच सदिच्छा!

-गुलजार गोलंदाज, स्वीय सहायक

संबंधित लेख