खबरदार! विनापरवानगी फलक, झेंडे लावाल, तर कारवाईला सामोरे जावे लागणार

रत्नागिरी  (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 साठीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केले असून त्यानुसार आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान वाहनांवर पक्षीय झेंडे व प्रचार फलकांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवर झेंडे व फलक लावण्यास आता स्पष्ट नियम लागू केले गेले आहेत. फिरत्या वाहनांवर पक्षाचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूला विंडस्क्रीनच्या पुढे नसावा तसेच वाहनाच्या टपापासून दोन फूटापेक्षा जास्त उंचीचा नसावा. याशिवाय प्रचार फलक केवळ वाहनचालकाच्या आसनाच्या मागील बाजूस, वाहनाच्या डावी व उजवी बाजू यावरच लावण्यास परवानगी राहील. इतर कोणत्याही भागावर फलक लावण्यास मनाई आहे.

फिरत्या वाहनांवर झेंडे व फलक फक्त संबंधित राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत निवडणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतलेल्या वाहनांवरच लावता येणार आहेत. परवानगी नसलेल्या वाहनांवर कोणत्याही स्वरूपाचा प्रचार साहित्य लावल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.

प्रत्येक व्यक्तीपर्यंत आदेश पोहोचणे शक्य नसल्याने पोलीस विभागाने ध्वनीक्षेपकाद्वारे हे आदेश जाहीर करावेत आणि प्रसारमाध्यमांनी त्याची व्यापक प्रसिद्धी करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित लेख