कोतवडे गावातील बौद्धवाडीतील बिबट्याची यशस्वी सुटका

रत्नागिरी: तालुक्यातील कोतवडे गावातील बौद्धवाडी येथे एका बिबट्याची सार्वजनिक विहिरीतून आज यशस्वी सुटका करण्यात आली. ही घटना सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली आणि अवघ्या १५ मिनिटांत बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित पकडण्यात आले.

आज, दिनांक २३ सप्टेंबर २०२५, सकाळी ७.३० वाजता कोतवडे गावचे सरपंच संतोष बारगोडे यांनी पाली येथील वनपालांना विहिरीत पडलेल्या बिबट्याची माहिती दिली. तात्काळ ही माहिती वन परिक्षेत्र अधिकारी, रत्नागिरी यांना देण्यात आली. बचाव पथक, पिंजरा आणि आवश्यक साहित्य घटनास्थळी पोहोचले.

ही विहीर ग्रामपंचायतीच्या घर क्रमांक ४२२ च्या मागील बाजूस असून ४० फूट खोल आहे. विहिरीत तीन फूट उंचीचा चिरेबंदी कठडा असून, पाण्याची पातळी १० ते १२ फूट होती. बिबट्या पायरीवर पाण्यात बसलेल्या अवस्थेत सापडला.

बचाव पथकाने तात्काळ नियोजन करून पिंजऱ्याला दोऱ्याने बांधून विहिरीत सोडले. बिबट्याने अवघ्या १५ मिनिटांत पिंजऱ्यात प्रवेश केला आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. नंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजीत भगवान कसाळकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. हा नर बिबट्या असून, वय अंदाजे ९ ते १० वर्षे आहे.

स्थानिक परिस्थिती पाहता, भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असल्याचे अनुमान आहे. विहीर शेडनेटने झाकलेली असल्याने तो बाहेर पडू शकला नाही.

ही बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कामगिरीत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, तसेच पोलीस अधिकारी मनोज पावसकर, वाडकर, होमगार्ड मनोज मोहिते यांनी परिश्रम घेतले.

सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील पड्याळ, पोलीस पाटील पूर्वा पवार, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी माने, दीया कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र कांबळे, तसेच ग्रामस्थ अनंत फणसोपकर, मयुरेश कांबळे, सुनील कांबळे, सुहास मोहिते, साहिल कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

संबंधित लेख