रत्नागिरीत धक्कादायक घटना; पत्नीने दिलेल्या विषामुळे पतीचा मृत्यू
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 133 views
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी परिसरात उत्तरप्रदेश येथून कामानिमित्त आलेल्या एका तरुणाचा त्याच्या पत्नीनेच विषारी पदार्थ देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांकडून दाखल झालेली तक्रार झिरो नंबरने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पत्नी आणि तिचे आई-वडील अशा तिघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव भानुप्रताप रामनिवास (रा. बरसोला कला, तिकोनियों, जिल्हा खिरी, उत्तरप्रदेश) असे आहे. तर संशयितांमध्ये त्याची पत्नी शर्मिला रामविलास, सासरे मनीराम कल्लूराम (वय ४५) आणि सासू (वय ४०, नाव माहित नाही, रा. बरसोला कला, तिकोनियों, जिल्हा खिरी, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून २०२५ रोजी ही घटना घडली होती. मृत भानुप्रताप याचे दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. फिर्यादी श्रीराम श्रीपाल निवास (वय ४५, रा. बरसोला कला, तिकोनियों, जिल्हा खिरी, उत्तरप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलगा आणि सुनेमध्ये नेहमी वाद होत असत.
संशयित मनीराम कल्लूराम यांच्या सांगण्यावरून भानुप्रताप व त्याची पत्नी रत्नागिरी येथे कामासाठी आले होते. काही दिवसांनंतर फिर्यादी श्रीराम यांनी मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र सुनेने किंवा मनीराम यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
दरम्यान, २० जून रोजी मनीराम यांनी फिर्यादींना फोन करून सांगितले की भानुप्रतापचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनेबद्दल फिर्यादींना संशय आल्याने त्यांनी २३ जून रोजी उत्तरप्रदेशातील तिकोनियों पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, सुनेने पतीला विषारी द्रव्य पाजून ठार मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तिकोनियों पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, तो झिरो नंबरद्वारे रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
त्यानुसार, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित पत्नी, सासू आणि सासऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.
या घटनेने रत्नागिरीत आणि उत्तरप्रदेशात मोठी खळबळ उडाली असून, कामानिमित्त स्थलांतरित कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
