शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 145 views
लातूर : राज्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यातच, चोरी आणि पैशांसाठी मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. आता, लातूर (Latur) जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था चांगली असल्याचा दावा होत असतानाच चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातील नायगाव येथे बी.एन. बार अॅण्ड रेस्टॉरन्टचे मालक गजानन नामदेव कासले (वय 42) यांची लाकडी काठीने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. उमरगा रोडवरील बारमध्ये काल रात्री उशिरा ही घटना घडली. या थरारक हत्याकांडाच्या घटनेनं उमरग्यातील हॉटेल व्यवसायिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तिघे अज्ञात मद्यधुंद अवस्थेत बारवर आले होते. त्यांनी सिगरेट मागितली असता न दिल्याने वाद वाढला आणि तिघांनी गजानन कासले यांना लाकडी काठीने मारहाण केली, या हल्ल्यात कासले यांचा मृत्यू झाला. कासले यांच्या डोक्यात 15 पेक्षा अधिक वेळास काठीने मारहाण झाली. ते जमिनीवर निपचित पडले असताना सुद्धा हल्लेखोर वरून सातत्याने काठीने मारत होते. या थरारक घटनेचा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र, हा प्रकार केवळ क्षुल्लक वादातून झाला नसून दरोड्याच्या उद्देशानेच ही घटना घडल्याची चर्चा उमरग्यात सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी काठी घेऊन हॉटेलच्या मॅनेजरच्या रूममध्ये जात गल्ल्यातील ड्रॉवर उघडून रोख रक्कम खिशात भरताना दिसतात. त्यावेळी रात्रीचे 11.50 वाजले होते. या हल्ल्यात बारमधील कर्मचारी अजय भरत मोरे (रा.अजनी, ता.अहमदपूर) हे जखमी झाले आहेत. तिघे आरोपी मोटारसायकलवरून आल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बालाजी नामदेव कासले यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध जबरी चोरी करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सहज घडलेला की दरोड्याचा, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेनं परिसरातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
