स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 18 views
देवरूख : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसने संगमेश्वर तालुक्यात महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसकडे प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची तीव्र कमतरता असल्याचे चित्र समोर येत आहे.
निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाही संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सात गट आणि पंचायत समितीचे चौदा गण, अशा एकूण २१ जागांसाठी काँग्रेसकडे अद्याप एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस नेतृत्वाची चिंता वाढली आहे.
संगमेश्वर तालुक्यात गट व गण पातळीवर उमेदवारांचा शोध सुरू असल्याची माहिती काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने दिली आहे. मात्र प्रत्यक्षात एकाही इच्छुकाने काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज न केल्याचे अंतर्गत सूत्रांकडून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या काँग्रेसच्या निर्णयामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व मनसे यांच्याशी संभाव्य युतीची शक्यता धूसर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीतीही अजून गुलदस्त्यातच असल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर केवळ राजकीय आव्हानच नव्हे, तर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार उभे करण्याचेही मोठे आव्हान उभे ठाकले असल्याचे स्पष्ट होत आहे.
