उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी चिपळूणमध्ये जाहीर सभा

चिपळूण  : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना–भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना चिपळूण शहरप्रमुख तथा नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी दिली. माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजप नेते प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रचार सभेचे नियोजन करण्यात येत असल्याचेही श्री. सकपाळ यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर युतीकडून जोरदार प्रचार सुरू असून, यापूर्वी नगर परिषद निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीकडून पुन्हा एकदा चिपळूणमध्ये मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

महायुतीची ही महत्त्वाची प्रचार सभा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी दिली. राज्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

या सभेला शिवसेना व भाजपचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच महायुतीचे सर्व उमेदवार, नगरसेवक, महायुतीचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही श्री. सकपाळ यांनी नमूद केले.

संबंधित लेख