आ. शेखर निकम ‘किंगमेकर’; चिपळूणमध्ये राष्ट्रवादीची दमदार कामगिरी

चिपळूण : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चिपळूण तालुक्यात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या सात जागा जिंकत राष्ट्रवादीने सेना-भाजप युतीच्या एकहाती सत्तेच्या इराद्याला मोठा धक्का दिला आहे. या विजयामागे आमदार शेखर निकम यांचे नेतृत्व निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राष्ट्रवादीची कठीण लढत, तरीही यश

ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी नव्हती. समोर शिवसेना-भाजप युतीचे भक्कम आव्हान होते. त्यातच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे पक्षावर दुःखाचे सावट होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करत राजकीय समीकरणे बदलून टाकली. आमदार शेखर निकम यांनी न डगमगता निवडणूक लढवून पक्षाला लक्षणीय यश मिळवून दिले.

पालिका निवडणुकीनंतरची पार्श्वभूमी

चिपळूण नगरपालिका निवडणुकीपूर्वी महायुतीत मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. नगराध्यक्षपदाचा प्रश्न सुटला नसल्याने राष्ट्रवादीने स्वतंत्र लढत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पालिका निवडणुकीत सेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले, तर राष्ट्रवादीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्या निकालानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीवर टीका करत स्थानिक पातळीवरील युतीचे दरवाजे बंद केल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची ठरली होती.

‘सर’ एकटे भिडले, समीकरणे बदलली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीसमोर ‘करो या मरो’ची परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे सेना-भाजप युतीकडून पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजपचे नेते प्रशांत यादव यांसारख्या दिग्गजांची फौज मैदानात होती. तरीही आमदार शेखर निकम यांनी राजकीय अनुभव आणि संघटनशक्तीच्या बळावर एकहाती लढत देत जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या सात जागा जिंकल्या. काही ठिकाणी अत्यल्प मतांनी पराभव पत्करावा लागला.

या निकालामुळे चिपळूण पंचायत समितीवर एकहाती सत्ता स्थापनेचे सेना-भाजप युतीचे स्वप्न भंगले आहे. आता सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. चार जागा मिळवलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी हातमिळवणी करणार की पुन्हा युतीसोबत जाणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख