प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उपअधीक्षक स्वतः शेतात
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 164 views
रत्नागिरी, दि. १४ (जिमाका) : जिल्ह्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा वेळेत करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र गोरे हे स्वतः शेतात उतरून मोजणीचे काम करत आहेत. माहे जानेवारी अखेर कोणतेही मोजणी प्रकरण मुदतबाह्य राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील तीन महावर प्रलंबित असलेल्या मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही मोजणी करण्याची विशेष मोहीम जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने उपअधीक्षक भूमी अभिलेख, रत्नागिरी कार्यालयात एकूण १३५ मोजणी प्रकरणे माहे जानेवारी अखेरीस मुदतबाह्य होण्याची शक्यता होती. त्यापैकी ९० प्रकरणांची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली असून ती सध्या कार्यालयीन प्रक्रियेत प्रलंबित आहेत. उर्वरित ४५ मोजणी प्रकरणांचे दौरे माहे जानेवारीमध्ये निश्चित करण्यात आले आहेत.
याशिवाय उरलेली १९ मोजणी प्रकरणे रविवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी, सुट्टीच्या दिवशी मोजली जाणार असून, यासाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे जानेवारी अखेर कोणतेही मोजणी प्रकरण मुदतबाह्य राहणार नाही, असा ठाम विश्वास उपअधीक्षक नरेंद्र गोरे यांनी व्यक्त केला आहे.
या विशेष मोहिमेस पक्षकारांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
